गुन्हे रोखण्याचा हाही मार्ग

मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर झालेला निर्घृण अत्याचार सध्या चर्चेत असून देशातील महिला वर्गाला संरक्षण दिले जात असल्याच्या वल्गना किती धादांत खोट्या आहेत, हे अधोरेखित झाले आहे. निर्भयासारखी अवघ्या देशात संतापाची लाट निर्माण करणार्‍या प्रकरणानंतरही इतक्या वर्षांनी बलात्कार, विनयभंग आणि खूनाचे प्रकार सुरूच आहेत. एकीकडे महिला सबलीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अशा घटना थांबवण्यात अपयशी व्हायचे हे बिघडलेल्या शासन व्यवस्थेचे लक्षण मानायला हवे. कडक कायदे आणि विनाविलंब, कठोर शिक्षा सुनावणारे निकालच या विकृतीला ठेचू शकेल.

महिलांच्या सुरक्षिततेवरून चर्चांना उधाण आले असताना देशाची प्रतिमा सुधारण्यात मदत करणारी एक घडामोड सुरू आहे. ओलाने खासगी टॅक्सीसेवा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावली असताना ते इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या उत्पादनात पदार्पण करीत आहे. तब्बल 2400 कोटी रुपये गुंतवून तामिळनाडूत सुरू होणार्‍या कारखान्यात दहा हजार महिलांना रोजगार देण्यात येणार आहे. ही घोषणा या देशातील महिलांच्या कर्तृत्त्वाला, त्यांच्यातील क्षमतांना आणि त्यांच्याप्रती आत्मसन्मान व्यक्त करणारी आहे. कुठे महिलांविरुध्द होणारे अत्याचार आणि कुठे त्यांच्या पंखांना बळ देणारी घटना. मुंबईतील दुर्दैवी प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर ओलाची घोषणा होणे हा योगायोग असला तरी आगामी काळात स्त्रीशक्तीचे देशविकासातील महत्व अधोरेखित होऊ शकते.

वर्षाकाठी दहा लक्ष इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती करण्याची ओलाची योजना आहे. त्यासाठी तीन हजार यंत्रमानव कार्यरत असतील. परंतु नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची महिलांची क्षमता ओळखून दहा हजार महिलांना रोजगार देण्याचे ठरले आहे. महिलांमधील गुणवत्ता उत्पादनप्रक्रियेस अनुकूल असते आणि काही वेळा तर त्या पुरुषापेक्षा अधिक दर्जेदार सेवा देतात असे तज्ज्ञांचे मत आहे. तसे पाहिले गेले तर गेल्या काही वर्षात महिलांनी त्यांच्या वाट्याला येणार्‍या संधीचे सोने केले आहे. हवाई जहाज उडवण्यापासून लष्करात जबाबदारीची पदे भूषविणार्‍या महिलांनी अंतराळ संशोधन असो की औषधनिर्मिती तंत्रज्ञान यात लक्षणीय कामगिरी बजावली आहे. महिलांमध्ये असणारी ध्येयासक्ती त्यांच्या उत्कर्षास सहाय्यभूत ठरत आहे. महिला शक्तीचा सन्मान समाजाने करायला हवा. गुन्हेगारीस आळा घालण्यात मदतच होईल.