…तर रिकामे हंडे भरतील !

दिवस पावसाचे आहेत, पण तरी वर्तमानपत्रांचे मथळे पाणीटंचाईच! गेली अनेक वर्षे हा विरोधाभास सुरू असून त्यावर प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना उपाय सापडू नये याचे आश्‍चर्य वाटते. जे विरोधी पक्षात असतात ते रिकामे हंडे घेऊन मोर्चा काढतात आणि सत्तेवर आले की अशाच मोर्चांवर टीकाही करतात. पाणी हा विषय राजकारणाचा होण्यास नेते, अधिकारी आणि काही प्रमाणात जनता जबाबदार आहे, असे वाटते.

मंगळवारच्या अंकात आम्ही दोन परस्पर विरोधी बातम्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिवा भागात पाणीटंचाई होत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची सोय केली. परंतु त्याचवेळी घोडबंदर रस्त्यावरील गृहसंकुलांना पुरेसा पुरवठा होत नाही म्हणून भाजपाने हंडा-मोर्चाही काढला. महापालिका हद्दीत एकाच वेळी असे दोन प्रकार होणे हे पाणीपुरवठा व्यवस्थेतील दोष सिद्ध करणारे आहे. महापालिका क्षेत्रात दररोज ४८५ दशलक्ष लिटर पुरवठा होत असतो. त्यापैकी घोडबंदर भागासाठी ९६.५० द. लि. असतो. लोकसंख्येच्या तुलनेत तो साधारणत: १०७ दशलक्ष असायला हवा. ही तूट भरून कशी निघेल याचा अभ्यास आंदोलनकर्त्यांनी केला असला पाहिजे. महापालिका प्रशासनाचे त्यावर काय म्हणणे आहे, हेही त्यांनी जाणून घेतले असले पाहिजे. थोडक्यात मूळ स्रोतातूनच पुरवठा होत नसेल तर महापालिका तरी पाणी कुठून आणणार आहे? मोर्चा काढून लक्ष वेधले जाईलही, पण प्रश्‍न सुटेल का? अशा वेळी पाण्यावरून राजकारण होणे उचित नाही, जनतेची ती एक प्रकारे दिशाभूल ठरते.

बिल्डरमंडळींना बांधकामासाठी पाणी दिले जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत तूट निर्माण होते काय? ही शंका मुंबई उच्च न्यायालयानेही घेतली होती. नवीन बांधकामे थांबवण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. अशा आदेशांना केराची टोपली दाखवली गेली तरी न्यायालयाचा अवमान झाला म्हणून खचितच याचिका होत नसते. त्यामुळे मोर्चे निघतात, न्यायालय निर्णय देतात, परंतु सत्तेत असणार्‍यांवर त्याचा यत्किंचितही परिणाम होत नसतो. या सर्व प्रकरणात जनतेचाही अप्रत्यक्ष संबंध येतो. पाण्याची चोरी असो वा गळती याकडे जबाबदार नागरिक कानाडोळा तरी करतात किंवा बेकायदा कृत्यात सहभागी तरी होतात. ठाण्यातील राजकारण्यांनी पाण्याच्या प्रश्‍नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. राजकारण करण्याऐवजी पाण्याचा शेतीसारख्या उपक्रमांसाठी पुढाकार घ्यायला हवा. रिकामे हंडे प्रयत्न केले तर भरू लागतील. हाच वेळ आणि शक्ती विधायक कामासाठी वापरता येईल.