राजकारणी उत्तम अभिनेते असतात म्हणुन अभिनेत्यांना या क्षेत्रात बस्तान बसवता येईलच असे नाही. तद्वत काही राजकारण्यांनी कॅमेर्यासमोर रुपेरी पडद्यावर झळकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. परंतु ज्याचे काम त्याने करावे या उक्तीला स्मरून वागतील तर ते नेते आणि अभिनेते कसले? राजकारणाचा चित्रपटसृष्टीशी घनिष्ट संबंध आला तो दक्षिणेत. करुणानिधी, एम.जी.रामचंद्रन, जयललिता, एन.टी.रामाराव, या मांदियाळीत अलिकडे कमलहसन, चिरंजीव वगैरे येऊन दाखल झाले. हेमामालिनी, जयाप्रदा, जया बच्चन अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, विनोद खन्ना, राजेश खन्ना, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा महाराष्ट्रातून उर्मिला मातोंडकर, दादा कोंडके, पश्चिम बंगालमध्ये सुचित्रा सेन वगैरे अशी किती तरी मंडळींनी नशिब अजमावून पाहिले. परंतु पडद्यावर या मंडळींनी आपापल्या कुवतीप्रमाणे जी काही कामगिरी बजावली ती लोकसभा वा राज्यभेत त्यांना करून दाखवण्यात आली नाही. या तारकांच्या शृंखलेत रजनीकांत या सुपरस्टार अभिनेत्याने तीन वर्षांपूर्वी हात-पाय मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी काढता पाय घेतला. रजनी मक्कल मंद्रम (आरएमएम) नावाचा पक्ष त्याने स्थापन केला होता. अलिकडे झालेल्या तामिळनाडूच्या निवडणुकीत तो प्रचारालाही बाहेर पडला नव्हता. अखेर त्याने पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय घेतला.
सिनेकलाकारांना राजकारणात मज्जाव करावा, असे आम्हाला नक्कीच वाटत नाही. काही झाले तरी तेही या देशाचे नागरीक असून संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न एकच आहे की कॅमेर्यासमोर ते फेकत असलेले संवाद लेखकाचे असतात. ते ऐकून प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्याही वाजवत असतात. परंतु ते त्यांचे विचार नसतात. राजकारणात स्वतंत्र विचार करून व्यक्त होण्याचे कसब लागते. ते यापैकी किती जणांकडे असते हे सांगणे कठीण आहे. प्रचारसभांना त्यांच्या गर्दी होत असते. पण ती बघ्यांची असते,श्रोत्यांची खचितच नाही. चंदेरी दुनियात मिळालेले वलय राजकारणात येताच झाकोळले जाते. आपली अशी फजिती होऊ शकते आणि जगभरात असलेल्या लाखो चाहत्यांच्या मनातून आपली प्रतिमा पुसली जाऊ शकते हे रजनीकांत यांनी वेळीच ओळखले हे बरे झाले. अशी सुबुद्धी सध्या हातपाय मारू पाहणार्या गोड-गोजिर्या बाहुले आणि बाहुल्यांना यावे हीच अपेक्षा. पॉलिटिक्स इज लास्ट रिसॉर्ट ऑफ रास्कल्स असे एका तत्ववेत्त्याने म्हटले होते. रजनीकांतच्या रास्कलाने योग्य वेळी एक्झिट घेतली असेच म्हणावे लागेल.