एका माजी मुख्यमंत्र्याला गमावल्यावर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना असा साक्षात्कार व्हावा, यावरुन त्यांना पक्षासमोरील प्रश्न समजले नसावे किंवा भाजपाच्या रणनीतीला सामोरे जाण्याची त्यांच्यापाशी व्युहरचना नसावी असाच निष्कर्ष निघू शकतो. काँग्रेस नेते जयराम रमेश हे पक्षाचे ज्येष्ठ, अभ्यासू आणि आदरणीय नेते मानले जातात. परंतु अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यावर रमेश यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या लौकिकास साजेशी नाही. चव्हाण यांनी पक्ष सोडल्यामुळे त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळेल. अशा कार्यकर्त्यांना संधीचे दरवाजे उघडे होण्यासाठी चव्हाण यांच्या ‘एक्सिट’ची वाट का पहावी लागली. जर कार्यकर्ते आणि दुय्यम नेते जबाबदारी घेण्यासाठी सक्षम होते तर त्यांना संधी का दिली गेली नव्हती? या उपेक्षित नेत्यांचा पक्षाला आज पुळका असेल तर तो केवळ झालेली नाचक्की थांबवण्यासाठी.
श्री. चव्हाण यांनी पक्ष सोडण्यापूर्वी श्रीमती सोनिया गांधी आणि पक्षाचे अन्य नेते यांच्याशी अगदी 24 तासांच्या अवधीत चर्चा केली होती. या तथाकथित ‘हाय कमांड’ला चव्हाण यांची अस्वस्थता समजू नये याचे आश्चर्य वाटते. देशातील आम जनतेची नाडी समजून घेण्यासाठी ‘भारत-जोडो’ यात्रासारखा कार्यक्रम हाती घेतला जातो. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री, माजी खासदार आदी नेते ‘पक्ष-तोडो’ भूमिका घेत असतील तर काँग्रेसला त्यावर चिंतन करावे लागेल. श्री. जयराम रमेश यांनी त्यांचा अनुभव आणि बुद्धीमत्ता या कामी खर्ची करायला हवी.
श्री. चव्हाण यांचा कथित संबंध असलेल्या ‘आदर्श’ घोटाळ्याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी संसदेत त्यांच्या भाषणादरम्यान केला होता. त्यावरून तडकाफडकी या घडामोडी घडल्या असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसे असते तर चव्हाण यांना पक्ष सोडण्यास भाग पडण्यापर्यंतच भाजपाची खेळी राहिली असती. परंतु तसे न होता चव्हाण यांना राज्यसभेत पाठवण्याचा घाट भाजपा घालू पहात आहे. यामुळे भ्रष्टाचाराला पुरस्कार दिला जातो काय असा प्रश्न विरोधी पक्ष विचारु शकतात. त्याचा खुलासा भाजपाला द्यावा लागेल. बेरजेचे राजकारण आणि त्यामागची नैतिकता हे दोन्ही विषय मतदारांना समजावून सांगण्याचे उत्तरदायित्व त्यांना पार पाडावे लागेल.
चव्हाण पक्षांतर प्रकरणाकडे काँग्रेस आणि विरोधी पक्ष परस्परविरोधी अंगाने पहात आहेत. त्यामागे दांभिकपणा आणि लपवाछपवी आहे. सर्वसामान्य जनतेला मुळातच पक्षांतरे आवडत नसतात. त्यांच्या मानसिकतेवर एकामागून एक आघात होत आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत त्यांच्या दृष्टिकोन पार बदलून गेलेला असेल. तो नेमका कोणाच्या बाजूने झुकला असेल हे सांगता येणार नाही. परंतु चारशेच्या वर जागा जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेला त्याचा त्रास होण्याची भीती नाकारता येणार नाही.