अस्वस्थता आभासी नको !

राष्ट्रवादी काँगेेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित आभासी कार्यक्रमात एक मौलिक संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असल्याचे बोलले जात असताना कार्यकर्त्यांनी समाजभिमुख दृष्टीकोन ठेवावा असे म्हटले. त्यासाठी ‘अस्वस्थता ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ओळख बनायला हवी,’ असे श्री. पवार म्हणाले.
राजकारणात प्रदीर्घ काळ वावरणाऱ्या श्री. पवार यांच्या या मताला सखोल अर्थ आहे. त्याचा उलगडा आगामी काळात कार्यकर्त्यांनी करून आपल्या कार्याची रुपरेषा ठरवायला हवी. त्यासाठी दूरदृष्टी हवी, असे श्री. पवार आवर्जून सांगतात तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटले नसले तरी प्रचलित राजकारण उथळ झाले आहे आणि त्याचा पोत विचारशुन्य, झाला आहे, असे त्यांना वाटत असणार. हे निरीक्षण सहा दशकांपेक्षा अधिक काळ सार्वजनिक जिवनात आघाडीवर असलेल्या व्यक्तीने करण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. मिशन म्हणून राजकारणात आलेली पिढी अस्तंगत पावली आणि तिची जागा कमिशनवाल्या सत्तालोलुप नेत्यांनी घेतली. सत्ता आणि स्वार्थ यांच्याशी सोयरीक केल्यावर समाजकारणाला तिलांजली मिळते. समाजाचा विचार मागे पडत गेला ही अस्वस्थता खरे तर समाजात धुमसू लागली आणि राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ झाला. अस्वस्थ कार्यकर्त्यांची वानवा हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. राजकारणातील ही उत्क्रांती श्री. पवार यांनी खुपत असेल तर त्यात चुकीचे नाही. परंतु या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांबाबत असलेल्या आक्षेपाचे उत्तर पवारांसारख्या नेत्यांना द्यावे लागेल. अस्वस्थ वाटणे ही त्या कार्यकर्त्यांची ओळख असायला हवी, असे म्हणताना हा गुण ‘इलेक्टीव्ह मेरीट’ मध्ये आणण्याचे काम सर्वच पक्षांना करावे लागेल. अनेक पक्षातील सच्चे, तळमळीचे आणि निःस्वार्थ कार्यकर्ते केवळ पैसा नाही आणि छक्केपंजे खेळता येत नाही म्हणुन मागे पडत आहेत. काही वर्षांपूर्वी विद्यमान गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी नेमक्या या मुद्यावर श्री. पवार यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. तत्कालीन खासदार संजीव नाईक यांना बोलावून त्यांचे निवडणूक काळातील अनुभव कथन करण्यास श्री. पवार यांनी सांगितले. राजकारण्यांच्या ते समाजही अनेकदा मतदान करताना कसा चुकीचा विचार करते हे दाखवून देण्याचा प्रयत्न श्री. पवार यांनी केला होता. सध्याच्या राजकारणात हे असे चुकीचे प्रघात आणि पायंडे पडल्यामुळे श्री. पवार हे हतबल झाल्यासारखे दिसत होते. हे सर्व श्री. पवार यांच्या ताज्या विधानामुळे आठवले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या या विचाराचे आचरण केले तर काय सांगावे समाजाची अस्वस्थताही दूर होईल. ज्या कार्यक्रमात श्री. पवार यांनी आवाहन केले तो आभासी होता, पण कार्यकर्त्यांनी हे आवाहन आभासी ठरवू नये म्हणजे मिळवले!