विज्ञानकथांना एकवेळ कल्पनाविलासाचे पंख असू शकतात. एखादी भन्नाट संकल्पना जी पुढे जाऊन कदाचित खरीही ठरते ती सुरूवातीला लेखकाच्या कल्पना शक्तीचा अविष्कार असतो. एलियन,स्टार वॉर वगैरे चित्रपट आठवतात ना? अवकाशात यान सोडण्याची अशीच एक कल्पना विज्ञानकथा लेखकांनी आपल्या सृजनशीलतेने फार पूर्वी फुलवली, पण त्यानंतर काही वर्षांनी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आणि मंगळावर स्वारीही केली. अब्जाधिश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी आपल्या सहा सहकार्यांसह अवकाशाच्या सीमेपर्यंत जाण्याचा विक्रम नोंदवला आहे. वयाच्या ७२व्या वर्षी दाखवलेले हे असामान्य साहस नक्कीच कौतुकाचा विषय बनला आहे आणि त्याची जगभर चर्चा सुरू आहे.
पृथ्वीवरील अनेक रहस्य मानवाने शतकानुशतके चिकित्सक वृत्तीने तर कधी जिज्ञासेपोटी उलगडली. त्यात संशोधकांचा मोठा सहभाग होता. आजही नवनवे शोध लागत आहेत आणि निसर्गातील चमत्कारांची गुपिते जगासमोर येत आहेत. मानवाची उपजत कुतूहलवृत्ती या प्रक्रियेमागचे मूळ आहे. रिचर्ड ब्रॅन्सन हे प्रथितयश उद्योजक आहेत. लौकिकार्थाने ते यशस्वी आहेत. गाठीशी बक्कळ पैसा आणि संपत्ती आहे. पण तरीही विश्वातली रहस्ये जाणून घेण्यासाठी प्रसंगी जीवावर उदार होऊन चित्तथरारक अनुभव घेण्याचे वेड खासच म्हणायला हवे. पैसा म्हणजेच सारे नाही या ऐहिकवादाला छेद देत मनात जपलेल्या स्वप्नांची साद ऐकणारे ब्रॅन्सन हे अवलियाचा म्हणायला हवे! त्यांच्या व्हर्जिन गॅलोक्टिक कंपनीचे ‘युनिटी-२२’ अवककाशयान जमिनीपासून ब्रॅन्सन यांच्या सहा सहकाऱ्यांसह तब्बल ८६ कि.मी. म्हणजे अवकाशाच्या सीमेपर्यंत जाऊन आले. त्यांच्या सहकार्यांपैकी एक भारतीय वंशाची सिरिशा बांदला ही होती, हे विशेष!
पूर्ण क्षमतेच्या यानाची पहिली मानवी चाचणी रविवारी अशा प्रकारे पार पडली. या सहा अवकाशयात्रींनी घेतलेला हा अनुभव इतिहासात नोंदवला जाणार. दिड तासांच्या या प्रवासानंतर ही मंडळी परतली आणि त्यांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी विलक्षण कामगिरी तर बजावली होतीच, पण त्याहीपेक्षा अवकाश पर्यटनाचे एक नवे दालन उघडले होते. या प्रवासात वाहक विमानापासून विलग झाले होते आणि पाच मिनिटांसाठी यात्रींनी वजनरहित अवस्थेचा अनुभवही घेतला होता. हा अनुभव घेण्यासाठी व्हर्जिन कंपनीकडे ६०० जणांनी नोंद पूर्वीच करून ठेवली आहे. मानवी स्वभावाचा हा पैलू त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला मर्यादा नाही हेच सिद्ध करते.