कसले आश्‍चर्य? कसले काय?

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 साली झालेल्या सर्वात्रिक निवडणुकीपूर्वी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याचा त्यांना भरघोस फायदा झाला. आता पुन्हा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि भाजपाने या खेपेस राजकीय सर्जिकल स्ट्राईक सुरु केले आहेत. अर्थात हे हल्ले सीमेपलिकडे होत नसून ज्या राज्यांत पक्षाला चांगले यश मिळवण्यासाठी काही ठोस पावले उचलावी लागतात त्या राज्यांतील विपक्ष छावण्यांवर करीत आहेत. महाराष्ट्र हे असे महत्वाचे राज्य आहे आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सामावून घेण्याची योजना झाली. राज्यातील राजकीय उलथापालथी, ताजा इतिहास पहाता ही घटना धक्कादायक अजिबात नाही. ज्यांच्या वडीलांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. पुढे श्री. अशोक चव्हाण यांनी तो कित्ता गिरवला. याचा अर्थ काँग्रेसचे संस्कार आणि विचारधारा घरात मुरली होती. तरी त्यांना पक्ष सोडावासा वाटला. एरवी घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपाने त्यांना खुल्या दिलाने स्वीकारले. त्याचाही धक्का वगैरे बसू नये. मिलिन्द देवरा हेही घराणेशाहीचा चिरेबंदी वाडा फोडून शिवसेनेत दाखल झालेच. हयातभर धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारे दोन नेते हिन्दुत्वाच्या वळचणीला जाऊन बसले!
श्री. अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. काँग्रेस नेतृत्व त्यामुळे बेसावध होते वगैरे असे मानता येणार नाही. त्यांनी श्री. चव्हाण यांची कैफियत ऐकून घेतली होती काय हा खरा प्रश्न आहे. पक्षाला रामराम ठोकण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते पक्षाच्या कार्यालयात आणि दिल्लीतून आलेल्या नेत्याशी बोलत होते. ते अस्वस्थ होते. त्यामुळे संबंधित नेत्याला त्यांच्या मनात चाललेला कल्लोळ समजला नसेल, असे वाटत नाही. त्यांनी समजुत काढण्याचा प्रयत्न केला असेल काय, हे कळायला मार्ग नाही. अर्थात त्यात त्यांना यश आलेले दिसत नाही. श्री. चव्हाण यांच्यासारखा मराठवाड्यातील प्रमुख चेहरा, माजी मुख्यमंत्री आणि भविष्यातील नेतृत्वाची क्षमता असणारा नेता पक्ष सोडतो, याचे दूरगामी परिणाम पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना समजत नसतील, तर खेदजनक आहे.
देशव्यापी ‘भारत जोडो’ यात्रा काढणार्‍या नेत्याला नेते एकमेकांशी जोडले जावेत असे वाटू नये? नेते आणि कार्यकर्त्यांमधील दुरावा कमी होण्याऐवजी वाढत जाण्याचे मुख्य कारण आगामी निवडणुकीतील संभाव्य यशाबद्दलची अनिश्‍चितता, सत्तेशिवाय रहाणे आणि तेही इतके प्रदीर्घ काळ, काँग्रेसला अशक्य आहे. त्यांचा जीव गुदमरु शकतो. अशा नेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेतृत्वाकडे जे गुण लागतात त्याची वानवा असणे हे काँग्रेसमधील मोठ्या गळतीचे कारण ठरू शकते. ना कोणता कार्यक्रम, ना आंदोलन, कार्यकर्ते एकत्र राहतीलच कसे? काँग्रेसच्या भवितव्याबद्दल एकुणच चिंता व्यक्त होत असताना अशोक चव्हाण यांचे पक्ष सोडून जाणे एक सूचक इशारा देणारे ठरते. तसे काही झाले तर आश्चर्य वाटणार नाही, हे मात्र तितकेच खरे!