सामंजस्यातून सुसंवादाकडे

नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर विचार करून निर्णय घेतला तर विसंवादाचा कटू प्रसंग टळून अकारण संघर्षाला तो येण्यापूर्वीच पूर्णविराम मिळू शकतो. याची प्रचिती आम्हाला अलिकडेच आली आणि त्याबद्दल ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आम्ही आभार मानतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने काही निर्बंध जाहीर करणारे परिपत्रक प्रसारित केले. त्यातील तरतुदी जाचक आणि अव्यवहार्य असल्याच्या तक्रारी ठाण्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी ‘ठाणेवैभव’ कडे करायला सुरूवात केली. व्यावसायिक आणि डॉक्टरमंडळींच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरून त्याबद्दल नापसंती व्यक्त होऊ लागली. ही मंडळी जे म्हणत होती त्यात तथ्य होते, परंतु त्यांचे गार्‍हाणे प्रशासनापर्यंत कोणी न्यायचे आणि योग्य बदल करून घ्यायचे हा प्रश्न होता. ही जबाबदारी संपादक या नात्याने आम्ही स्वीकारली आणि आयुक्त डॉ. शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनाही विषयाचे गांभीर्य कळले आणि काही क्षणांत उपायुक्त मनिष जोशी यांनी आमच्याशी संपर्क साधला. सुमारे ३०-३५ मिनिटे साधक-बाधक चर्चा झाल्यावर श्री. जोशी यांनी आमचे म्हणणे पटले. आयुक्तांशी सल्लामसलत करून त्यांनी परिपत्रकात बदल केले. यामुळे कोरोना रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण मजला प्रतिबंधित करणे, इतर रहिवाशांना चाचणीच्या ससेमिर्‍याला सामोरे जाणे आदी जाचक अटी वगळण्यात आल्या. डॉ. शर्मा आणि श्री. जोशी यांनी दाखवलेली सकारात्मकता दिलासादायक आहे. आगामी काळ हा किती प्रतिकुल होईल हे सांगता येणार नाही. परंतु प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय असेल तर आपण त्यातून निभावून जाऊ असे वाटते. ‘ठाणेवैभव’ च्या सूचनांची गंभीर दखल घेतली जाणे ही आमच्या सकरात्मक पत्रकारितेला दिलेली पावती आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि लाटा यांचा कोणीच निश्चित अंदाज बांधू शकणार नाही. यामुळे प्रचंड अनिश्चितता पसरणार आहे. अशा वेळी निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करून अफवांवर विश्वास ठेवणे वा पसरवणे यापासून दूर रहाणे, सामुहिक जबाबदारीचे भान ठेऊन खाजगी आणि विशेषतः सार्वजनिक ठिकाणी वर्तन करणे यांवर लक्ष दिले गेले तर तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. पहिल्या दोन लाटांतून उपचार पद्धती स्पष्ट झाली. संशोधकांच्या अथक परिश्रमातून लस बाजारात आली आणि आता तिसर्‍या लाटेत या जमेच्या बाजूंमुळे भीती कमी झाली.
या पार्श्वभूमीवर प्रशासनही जनतेच्या संवेदनाशी एकरूप होत असल्याचा सुखद अनुभव ठाणे महापालिकेने दिला. याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो.