सण येत होते आणि जात होते. उत्साह आणि आनंद मानावा इतक्याच प्रमाणात होता. सण साजरे होणे दूरच राहिले होते. उरली होती ती सारी औपचारिकता. गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झालेली ही परिस्थिती या पाडव्यापासून बदलेल आणि घरोघरी नवचैतन्याची आणि आशेची तोरणे लागतील ही अपेक्षा आहे. सरकारी पातळीवरही विकासाचा गाडा हळूहळू पुढे सरकू लागला आहे. उत्पन्नाचे स्रोत खुले होऊ लागले आहेत आणि आर्थिक उलाढाल वेग पकडू लागली आहे. कोरोना जवळजवळ संपत आला असून नव्याने सुरुवात करण्याचा विश्वास मनामनात उत्पन्न होऊ लागला आहे. नवीन वर्षाची चाहूल नव्या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात करून तर जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्यांचे उदघाटन होऊन दिसू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेसह विविध कामांचे उदघाटन आणि भूमिपूजन होणार आहे. आगामी काळात खास करून महापालिकांच्या निवडणूक तोंडावर असताना रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा राजकीय फायदा त्यांच्या डोळ्यांसमोर असेल तर ते स्वाभाविकच आहे.
अर्थात प्रत्येक गोष्टीची सांगड राजकारणाशी घालणे उचित नाही. विकास कोणामुळे होतो यापेक्षा तो होणे आणि वेळेत होणे याला महत्व आहे. त्यामुळे उदघाटन आणि भूमिपूजन करण्याची संधी मिळाली नाही म्हणून काही नेते नाराज जरूर असू शकतील. त्यांनी ही नाराजी दूर ठेवायला हवी. मतदारांना कल्पना असते की एखाद्या कामाचे श्रेय कोणाला द्यायचे, कोण आयत्या बिळावरचा नागोबा आहे, कोण राजकारण करीत आहे वगैरे. ते दाखवून देण्यासाठी नेत्यांनी इतके घायकुतीला येण्याची गरज नाही. जे सत्तेवर असतात त्यांनीही मोठ्या मनाने आपल्या विरोधी सहकार्यांना कार्यक्रमात सामावून घेणे समंजसपणाचे ठरेल. परिपक्वतेची गुढी उभारण्याची या क्षणी गरज आहे.
कोकणातील वादग्रस्त नाणार प्रकल्प आता बारसूला करण्याची तयारी दाखवून शिवसेनेने ही परिपक्वता दाखवली आहे. विकासाबरोबर पर्यावरणाची आणि स्थानिकांच्या हितसंबंधांची काळजी घेतली गेली तर वादाचे मुद्दे गळून पडतात. एरवी पर्यावरण हा तोंडी लावण्यापुरताच विषय असतो. त्याचा सोयीने अर्थ लावला जातो. जनतेची सोय बघण्याचे शहाणपण सर्वपक्षीय नेत्यांना या नवीन वर्षापासून यावे ही अपेक्षा.
विकासात राजकारण आले की प्रकल्प रखडतात. त्यांचे खर्च वाढतात. हा सारा पैसा शेवटी सरकारी तिजोरीत जनतेकडून जमा होणाऱ्या करातूनच जात असतो. पैशांचा अपव्यय होऊ नये याची काळजी या पाडव्यापासून घेतली जाईल ही आणखी एक अपेक्षा. कोरोनापश्चात एका नव्या युगास प्रारंभ होत आहे. अशा वेळी मनातील गैरसमजुतींची जळमटे आणि पूर्वदूषित दृष्टीकोनाची कोमेजलेली तोरणे काढण्याची गरज आहे. तसे केले तर एका चांगल्या वैचारिक शोभायात्रेस सुरुवात होईल.