पदाची अभिलाषा असण्यात काही गैर नाही. राजकारण्यांच्या हालचाली सत्तेभोवती फिरत असतात हे आपण जाणून आहोत. अनेकांना जंगजंग पछाडूनही सत्ता हुलकावणी देत रहाते तर काही जणांना ती आयती प्राप्त होते. कोल्हापूर जिल्ह्यातील एका 90 वर्षीत राजकारण्याला 59 वर्षे लोटली तरी सरपंचपद काही गवसत नव्हते. अखेर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या विनंतीला विशेष बाब मानून संबंधित इसमास एका आठवड्यासाठी सरपंचपद बहाल केले. आमच्या मते ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा हा मोठेपणा तर आहेच, पण देशातील लोकशाही परिपक्व असल्याचे द्योतक आहे. अशा समंजसपणा आपल्या नेत्यांनी दाखवला तर राजकारणाच्या माध्यमातून अडलेल्या समाजकारणाला वाट मोकळी होईल.
तर ही कहाणी आहे माणगावची गावाला ऐतिहासिक महत्व आहे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या गावात शाहू महाराजांच्या सोबत सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या गावात रहाणारे बापू पिरा कांबळे, हे कट्टर आंबेडकरवादी कार्यकर्ते 1962 पासून सरपंचपदासाठी अयशस्वी प्रयत्न करीत आले आहेत. निवडणुकीत कधी तरी विजयश्री गळ्यात पडेल या आशेवर असणार्या बापूंनी अलिकडे नव्वदी पार केली. पण सरपंचपदाचे स्वप्न काही केल्या साकार होईना.
वयाच्या तिशीत सुरू झालेला त्यांचा प्रवास गावकर्यांसाठी कुतुहलाचा विषय बनला होता. प्रेमाने अण्णा असे बापूंना संबोधले जात असते. त्यांच्याबद्दल गावकर्यांना आदर आणि प्रेम असला तरी निवडणूकीत मात्र त्याचे प्रत्यंतर येत नव्हते. अखेर जि.प.ने विशेष बाब म्हणुन गावकर्यांची विनंती मान्य करीत अण्णांना आठवड्यासाठी सरपंच म्हणुन काम करण्याची अनुमती दिली. या निर्णयाचे स्वागत करताना अण्णांनी जी प्रतिक्रिया दिली ती या देशातील लोकशाहीबद्दलचा आदर वाढवणारी आहे. राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे कर्तव्य पद नसताना पार पाडले. आता सरपंच (आठवडाभर का होईना) म्हणुन हेच कर्तव्य बजावेन असे अण्णा म्हणाले. बाबासाहेबांचे इतका यथोचित सन्मान खचितच झाला असेल! ग्रामीण भागात लोकशाही रुजली आहे आणि तिचे संवर्धनही होत आहे, हे सुखद चित्र माणगावमुळे जगापुढे आले.