ठाणे लोकसभा निवडणुकीत ‘आनंद दिघे फॅक्टर’ येणार आणि पक्षांतर्गत होणार्या मतविभागणीत ज्याच्या पारड्यात भगवी मते अधिक पडतील ती आनंद दिघे अंडरकरंटची असणार, असे आम्ही सुरुवातीपासून म्हणत आहोत. त्याचा प्रत्यय सोमवारी नरेश म्हस्के यांच्या एका प्रचार सभेत आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान कै. दिघे यांचा उल्लेख करताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राजन विचारे यांच्यावर निशाणा साधला. सहाजिकच त्याची जी ‘रिअॅक्शन’ यायची ती आली आणि एरवी माध्यमांसमोर मोजकेच बोलणारे विचारे एकदम आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रतिस्पर्धी झालेले नरेश म्हस्के यांच्यावर पलटवार केला. हे सर्व ‘लाईव्ह’ प्रसारित झाले आणि ठाण्याचा मतदारसंघ अचानक राज्य पातळीवर झळकला. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणुन सर्वांचे लक्ष होतेच, त्यात पुन्हा भाजपाने या जागेसाठी केलेला अट्टाहास आणि त्यातून उमेदवारी जाहीर होण्यास झालेला विलंब या कारणास्तव माध्यमातून बातम्या येत होत्याच. श्री. शिंदे यांनी ठाण्याच्या बालेकिल्ल्याचा मुद्दा पुढे रेटला आणि सेनेकडे जागा कायम ठेवली. अर्थात विद्यमान खासदार हेही शिवसेनेचेच (उद्धव ठाकरे गट) असल्याने उभयतांत ‘हाय-व्होल्टेज’ नाट्य होणार हे निश्चित झाले. संघर्षाच्या ठिणग्या, आरोप-प्रत्यारोप, अगदी गद्दार, खोके, असली-नकली, आदी सार्या विशेषणांची मुक्त उधळण होणार आणि मतदार अशा गढूळ वातावरणात संभ्रमावस्थेत जाणार हे गृहीत धरले जाऊ लागले होते. अशावेळी ठाण्यात आणि त्यातही आनंद दिघे यांच्या ठाण्यात निवडणूक होत असताना त्यांना वगळून ती कशी होणार? नेमके तसेच झाले आणि दिघे-कार्ड दोन्ही सेनांनी वापरायचे ठरवले.
कै. दिघे यांचे निधन होऊन आता दोन दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. म्हणजे जे शिवसैनिक आज तिशीतले असतील त्यांना या बड्या नेत्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे दुर्मिळच. जे 30 ते 50 वयोगटातले असतील त्यांना मात्र कै. दिघे यांना पहाता आले असणार. जे पन्नाशीपुढचे सैनिक आहेत त्यांना कै. दिघे यांचा सहवासही लाभला असेल किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली असणार. यात आणखी एक वर्ग आहे आणि तो म्हणजे जो अमराठी नागरीक ठाण्यात वास्तव्यास आला त्यांनी तर दिघे यांचा करिष्मा फक्त ऐकला असणार. अशा या चार वर्गात मोडणार्या पारंपारिक सेना-मतदारांवर दिघे यांच्या ‘अंडर-करंट’चा प्रभाव पडू शकतो. तो पाडण्यासाठी दिघे-भक्त म्हणा की दिघे-अनुयायांनी एकमेकांना कमी लेखण्याची गरज आहे काय? ही स्पर्धा दिघे यांच्या पुण्याईवर अवलंबून नेत्यांना अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही. त्यामुळे उर्वरित प्रचारात कै. दिघे यांचे नाव अधिक जबाबदारीने घेतले गेलेले बरे. शेवटी नाही म्हटले तरी ‘अंडर-करंट’ आहे. त्याचा शॉकही बसू शकतो किंवा लख्ख प्रकाशही! विजेच्या तारांना हात लावताना ‘तार’तम्य बाळगले जाईल ही अपेक्षा.