आता ‘त्यांना’ थांबवू नका !

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. त्यानिमित्त चार दिवसांपासूनच महिला सक्षमीकरण, स्वातंत्र्य वगैरे विषयांवर सार्वजनिक चर्चाविश्वात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिला वर्गावर सनातन काळापासून होत आलेला अन्याय आणि उपेक्षा यांची गडद छाया कमी होत चालली आहे हे मान्य के ले तरी तुरळक प्रमाणात का होईना त्यांचे शोषण सुरू आहे. त्यांचा आवाज दाबला जात आहे आणि त्यांना हक्कांपासून वंचितही ठे वले जात आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणेपुरते सरकारचे उत्तरदायित्व राहिले नसून त्यास समाज कसा प्रतिसाद देतो हे पाहण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे. शिकल्या-सवरलेल्या मुली पुन्हा अन्यायग्रस्त होणार नाही तर त्यांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मुख्य प्रवाहात आणणे असे दहुेरी काम करावे लागणार आहे. त्यासाठी योग्य ती वातावरणनिर्मिती आणि जनजागृती होते की नाही ही जबाबदारी सरकारच्या खांद्याला खांदा लावून पेलावी लागणार आहे. महिलांना पुढे जाऊ न देण्याची उपजत पुरुषप्रधान प्रवृत्ती कमी हो  चालली असली तरी महिलांना पदोपदी झगडावे लागत आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कर्तबगार अधिकारी असो वा प्रभावी लोकप्रतिनिधी, यशस्वी उद्योजिका असो की नेतृत्वाची चमक असणारी महिला. त्यांच्यातील या गुणांना प्रोत्साहन देण्याऐवजी ते खुरडून टाकण्याचे काम होताना दिसते. बायकांच्या पश्चात, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख करणाऱ्या, काही पुरुष जे बोलतात ते लक्षात घेतले तर या मानसिकतेत अमुलाग्र बदल व्हावा असे वाटते. सर्व क्षेत्र व्यापणाऱ्या महिलावर्गाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व थरांवर प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. अनेकदा महिला या योजनांबद्दल अनभिज्ञ असतात. त्यांना या योजना, संधीची नवी दालने आणि उत्कर्षाच्या कधीच न चाललेल्या पायवाटा दाखवणे हे महिला हितासाठी झटणाऱ्या संस्थांनी करायला हवे. या पार्श्वभूमीवर एक चांगली माहिती हाती आली आहे. महिलांच्या विकासातील मोठा अडथळा असतो तो त्यांच्या आर्थिक परावलंबनत्वाचा. महिलांच्या समान अधिकाराच्या कितीही वल्गना होत असल्या तरी पुरुषच त्यांच्या वतीनेनिर्णय घेत असतात हे सरपंच पदापासून अगदी मंत्रिपदावर विराजमान महिलांबाबत बोलता येऊ शके ल. तरीही देशातील महिलांच्या आर्थिक स्थितीचा जो ताजा अहवाल आला आहे तो पाहता गेल्या अनेक वर्षांपासून 8 मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्याची संकल्पना औपचारिक आणि समारंभ या चौकटीतून बाहेर पडली असेच म्हणावे लागेल. 2017 ते 2022 या पाच वर्षात व्यवसायासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे. महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले असून चांगल्या पदवीधर मुली उद्योग क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यान्वित आहेत. परग्रहावर जाणाऱ्या पथकांत त्यांचा समावेश होत आहे, क्रीडा क्षेत्रात त्या भरारी घेत आहेत, त्या विमाने उडवत आहेत, एकट्याने जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पर्यटन करीत आहेत. साहस, जिज्ञासा आणि मेहनतीची आसक्ती यामुळे महिलांची घोडदौड सुरू आहे. त्यांचा हा प्रवास असाच निरंतर, निर्वेध आणि यशस्वी होवो याच शुभेच्छा !