राजकारण अधिकाधिक व्यक्तीधिष्ठित होत चालले असताना पक्षाचे नाव, चिन्ह आदी गोष्टींना किती महत्त्व रहाते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवसेनेकडून चिन्ह आणि नाव या दोन्ही बाबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्यावर श्री. उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि ताज्या निकालानंतर श्री. शरद पवार यांनी व्यक्त केलेले मत विसंगत आहे. श्री. पवार हे श्री. ठाकरे यांच्याप्रमाणे भावनिक झाले नाहीत. उलट उद्भवलेल्या परिस्थितीला समर्थपणे उत्तर देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री. ठाकरे यांनी त्यांच्यावर आलेला प्रसंग स्वीकारुन पुढे चालायला सुरुवात केली आहे, परंतु त्यांच्या भाषणांत अनेकदा त्यांच्या मनातील सल व्यक्त होत असते. श्री. पवार यांनी अधिक पावसाळे पाहिल्यामुळे ते लढाईस सज्ज झाल्याचे दिसते. राजकारणात भावनांना किती हवा द्यायची यावर त्या नेत्याचे भवितव्य अवलंबून असते. श्री. पवार आणि श्री. ठाकरे यांच्या दृष्टीकोनांतील हाच मूलभूत फरक आहे.
शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता तोच राष्ट्रवादीबाबत दिला जाईल ही अटकळे होतीच. प्रश्न हा आहे की निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना उभय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते नव्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतात. भाजपाने हे कारस्थान आखले असे बोलले जात असले तरी त्यासाठी पुरावा सापडणार नाही. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा लावून धरुन उध्दव ठाकरे यांची सेना आणि स्वतः श्री. पवार सहानुभूतीची लाट निर्माण करीत रहातील, हा प्रयत्न श्री. उध्दव ठाकरे सेनेकडून झाला. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. श्री. शरद पवार यांना तो कसा मिळवता येईल हे पहावे लागेल. मुळात राजकीय पक्षांना जनतेची सहानुभूती मिळणे दुरापास्त होत चालले आहे. राजकारणातील विधीशून्य अनैतिकता त्यांच्याबद्दल सहानुभूतीऐवजी घृणा निर्माण करीत आहे. कोणताच नेता ‘बिच्चारा’ वगैरे नसतो यावर जनतेचे एकमत आहे. याचे कारण जनतेच्या अपेक्षांना हे पक्ष कधीच उतरु शकलेले नाहीत. त्यांची स्वार्थी वृत्तीच त्यांना सहानुभूतीपासून दूर लोटत रहाणार आहे. सत्तारुढ भाजपाचे डावपेच यशस्वी होत चालले आहेत. अर्थात त्यांनाही मतदारांचे शंभर टक्के समर्थन मिळेलच असे नाही. तसे समर्थन हुकुमशाहीतच मिळू शिकते. अशावेळी निवडणूक ही औपचारिकता बनून रहाते. तशी शंका पंतप्रधानांनी लोकसभेतही चारशेच्या वर जागा जिंकण्याची घोषणा केल्यामुळे येऊ लागली आहे.
पक्ष जुना होत गेला की त्याला आपोआप सुरक्षा कवच मिळते हा भ्रम तुटला आहे. शिवसेनेच्या बाबतीत जे झाले तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत झाले. हा योगायोग नाही. त्यामागे निश्चितच राजकारण आहे. परंतु जे दोन्ही पक्ष आता अडचणीत आले आहेत त्यांनी योग्य काळजी घेतली असती तर त्यांची ही अवस्था झाली नसती. त्यांना पुन्हा उभे रहाण्यासाठी आणि तगडे आव्हान देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. दुर्दैवाने त्यांच्या हातात वेळ मात्र फार कमी आहे. ‘घड्याळ’ गेले आणि टाईमिंगही हातात राहिले नाही. ही अवस्था झाली आहे. श्री. पवार यांना मुत्सद्दीपणाचा एक मोठा धमाका करुन दाखवण्याची ही शेवटची संधी आहे.