ही जबाबदारीही घ्या !

कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येत असताना ओमायक्रॉनच्या रुपाने विषाणूचा परिवर्तित अवतार प्रकटला आणि पुन्हा एकदा त्याने जगाला दीड वर्षे मागे न्यायला सुरूवात केली. पुन्हा लॉकडाऊनची चाचपणी शासन- स्थरावर सुरू झाली तर आरोगय यंत्रणेने काळजीपोटी दिलासा देण्याऐवजी समाज पुन्हा पुरेसा चिंताक्रांत होईल याचीच काळजी घेतली! पत्रकारांना बऱ्याच दिवसांनी जुना छंद जोपासण्याची संधी मिळाली. सायंकाळी आवर्जून ओमायक्रॉनचे (अनेकांना त्याचा उच्चारही नीट करता येत नाही!) रुग्ण सापडला का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. ज्या नव्या विषाणूच्या अवताराबद्दल वैद्यकीय मंडळी अनभिज्ञ आहेत त्यावर कोणीही उठून (अधिकारवाणीने) भाष्य करू लागला आहे. यामुळे शाळा सुरू होण्याच्या चर्चा मागे पडल्या. मुलं पुन्हा क्रिकेटच्या मैदानात आणि दिवसा जमेल तेवढे आणि तेव्हा ऑनलाईन शिक्षण घेण्यात मग्न झाले. लग्न समारंभ सुरू आहेत, मेजवान्या झडत आहेत, वराती निघत आहेत, रात्री अपरात्री फटाके वाजत आहेत, साहित्य संमेलन पार पडले आहे, नाट्यगृ सुरू झाले आहे, ‘पांडू’ पहायला लोक बाहेर पडत आहेत. पण पोरांना शाळेत पाठवायची वेळ आली की त्यांना अचानक आरोग्याची काळजी वाटू लागत आहे. दांभिकपणाचा विषाणू भारतीय समाजाच्या शरीरात कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्याचे जणू द्योतक!
कोरोना.१ पासून काही न शिकलेला समाज कोरोना.२ या आवृत्तीमध्ये तितक्याच बेपर्वाईने वागताना दिसत आहे आणि शासन आणि शासनकर्ते यांना त्याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. आपले पाल्य ६०० दिवस (१४,४०० तास) शाळेत गेले नाही, त्याच्या मानसिकतेवर आणि मेंदूच्या जडणघडणीवर विपरित परिणाम होत आहे याची यत्किंचितही चिंता कोणाला वाटू नये, याचा खेद वाटतो.
अशा वेळी माध्यमांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे वाटते. ओमायक्रॉनच्या बातम्या देताना त्या अतिरंजित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ज्यांना या नव्या विषाणूची बाधा झाली आहे, ते बरे झाल्यावर त्याचीही नोंद घ्यावी. लोकांना घाबरवण्याऐवजी दिलासा देण्याचे काम माध्यमे कधी करणार आहेत? ब्रेकिंग बातम्या देताय तर मेकिंग बातम्याही द्या की. विषाणूचा प्रसार वृत्तप्रत्रांच्या कागदामधून प्रत्यक्ष होत नसतो पण मनात त्याचा शिरकाव नकारात्मक बातम्या देऊन होणार नाही याची जबाबदारी सर्वांनाच घ्यावी लागेल.