विकास संपला की काय?

राज्यातील 11 मतदासंघांमध्ये उद्या (मंगळवारी) मतदान होईल. त्यामुळे 48 पैकी 24 मतदारसंघांत मंगळवारी सायंकाळपर्यंत मतदान झाले असेल. उर्वरित दोन टप्प्यात 24 मतदारसंघ आपला हक्क बजावतील आणि 4 जूनपर्यंत मतदारांनी दिलेला कौल मतदानयंत्रांत कैद झाला असेल. पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाची आकडेवारी घसरल्याचे दिसून आले. त्यामुळे हा टक्का वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर तसेच राजकीय पातळीवर विशेष प्रयत्न होतील. मतदान कमी होण्याची असंख्य कारणे दिली जात आहेत. त्यापैकी एक अचानक वाढलेले तापमान हे पटण्यासारखे असले तरी उन्हाळ्यात निवडणुका होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. रणरणत्या उन्हांत मतदान केंद्राबाहेर रांगा लागत होत्या. हे चित्र या खेपेस अभावानेच दिसले. त्याची खरी कारणमीमांसा राजकीय पक्षांना पटणारी नाही. मात्र ते वास्तव आहे आणि ते जितके लवकर ते स्वीकारतील तितक्या लवकर मतदानाचा टक्का वाढू लागेल. राजकारणाचा आलेला तिटकारा आणि पुढार्‍यांनी गमावलेली विश्‍वासार्हता यामुळे जनतेचा लोकशाहीवरचा आणि पर्यायाने निवडणुकीवरचा विश्‍वास उडाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये! काय त्यांची ती भाषा, काय ते आरोप आणि काय तो निर्लज्ज दांभिकपणा, असे म्हणण्याइतकी वाईट परिस्थिती या नेतेमंडळींनी त्यांच्या वर्तनातून सिद्ध केली. नेत्यांच्या प्रतिमेचे तीन तेरा वाजल्यावर मतदाराला मतदान करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे वाटत असेल तर त्याचे आत्मपरिक्षण करायला हवे.
आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात विकासाचा मुद्दा हरवून गेला आहे असे वाटत आहे. 2014 मध्ये विकासाच्या मुद्याचा चलाखीने वापर करुन नरेंद्र मोदींनी बाजी मारली. वास्तविक 2004 ते 2014मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केलेला भ्रष्टाचार त्यांना सत्ता काबिज करण्यासाठी पुरेसा होता. पण भाजपाने प्रचाराच्या तोफांमध्ये एकट्या टीकेचा दारुगोळा न ठेवता विकासाच्या मुद्यावर भर दिला. 2019 पुलवामामुळे जिंकले म्हटले तर सत्तारुढ पक्षावर अन्याय करण्यासारखे ठरू शकेल. 2014 ते 2019 या काळात विकासाबाबत आश्‍वासक चित्र निर्माण झाले होते हेही तितकेच खरे होते.
या दोन निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या खेपेस विकासाचा मुद्दा जवळजवळ गायब झाला आहे असे वाटते. हा आवाज क्षिण झालेला दिसतो आणि अयोध्येतील राम मंदिराच्या जनतेला ‘जोडणारा’ विषयही म्हणावा तितका प्रचारकी मुद्दा झाल्यासारखे वाटत नाही. विकासाबाबत बोलले जावे ही मतदारांची अपेक्षा आहे, हे लक्षात घेतले तर मतदानाचा टक्का वाढू शकतो. अन्यथा ‘असली-नकली’, गद्दार-नामर्द, खोके-ओके या भोवतीच ती फिरत रहाणार. सध्याचा प्रचाराचा रोख पहाता विकास संपला असा प्रश्‍न पडतो!