‘ॲक्शन मोड’ ! 

संधीचे सोने करणे काय असू शकते याची झलक नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या भाषणात दिली. अपेक्षेप्रमाणे सभागृहाचा विश्वास संपादन केल्यामुळे श्री. शिंदे यांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे भाषणातून जाणवले. मुख्यमंत्र्यांभोवती असलेले वलय भेदून एक सर्वसामान्य शिवसैनिक संधी मिळाली तर काय चमत्कार घडवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. राज्यात घडलेल्या सत्तांतर महानाट्याच्या कडू-गोड आठवणी, वाट्याला आलेली अवहेलना आणि उपेक्षा, अनैसर्गिक सत्तासमीकरणामुळे झालेली कोंडी आणि व्यक्तिगत जीवनातील प्रकाशझोतापासून दूर राहिलेले हळवे कोपरे श्री. शिंदे यांनी भाषणातून उलगडून दाखवले. विरोधी पक्षांनाही एक वेगळे एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. आपले सरकार आकस किंवा सूडबुद्धीने वागणार नाही असा दिलासा देऊन गेल्या काही दिवसांपासून घसरलेली राजकीय पातळी त्यांनी उचलली. एक परिपक्व आणि मुत्सद्दी राजकारणी त्यांच्या भाषणातून उमटत होता. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे वक्तृत्व असामान्य दर्जाचे, त्यांना मनमोकळी दाद देत होते. एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील एंट्री दमदार होती असे म्हटले तर वावगे ठरू नये.

श्री. शिंदे आणि त्यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या शिवसेना आमदारांना जी गोष्ट सर्वाधिक बोचली होती, ती म्हणजे शिवसेना नेत्यांकडून ‘गद्दार’ म्हणून हिणवले जाणे. त्यांचा समाचार घेताना श्री. शिंदे यांचा तोल गेला नाही आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा उठून दिसून आली. त्यांच्या भाषणात आवेग होता. अडीच वर्षात शिवसेना आमदार तसेच सर्वसामान्य शिवसैनिकांवर झालेल्या अन्यायाची बोच होती. हे अन्याय दूर केले जातील ही सकारात्मकता शिवसैनिकाला साजेशी होती. ‘करून दाखवले’ असे बोलण्याऐवजी ‘करून दाखवू’ हा आत्मविश्वास भाषणातून व्यक्त होताना दिसला. शिवसैनिकांच्या मनात त्यामुळे त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण होऊ शकतो. शिवसेना नेतृत्वाला आव्हान दिल्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होत राहणार. श्री. शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सेना आमदारांना धडा शिकवण्याचा क्षोभ विधिमंडळातील भाषणामुळे शमू शकतो. सभागृह जिंकता-जिंकता शिवसैनिकांकडे आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न चांगला होता. त्यात राजकारण जरूर होते, पण श्री. शिंदे यांच्या सहजतेमुळे ते दिसले नाही. उलटपक्षी त्यातून प्रामाणिकपणा दिसत होता. आपण बाळासाहेब ठाकरे आणि कै. आनंद दिघे यांचे सैनिक आहोत, असे सांगताना त्यांनी साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विरोधी पक्षातील दिग्गज अजित पवार, जयंतराव पाटील, छगन भुजबळ, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात आदी मंडळी श्री. शिंदे यांना शब्दात पकडण्याची संधी शोधण्याऐवजी त्यांच्या भाषणाचा मनमुराद आनंद घेत होते.

इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे सूतोवाच करून त्यांनी मुख्यमंत्री ‘ॲक्शन मोड’ मध्ये आहे आणि अडीच वर्षांचा अनुशेष भरून काढण्याची त्यांना घाई आहे, हेच त्यांच्या भाषणाने दर्शवले !