राजकारणात टाईमिंगला महत्त्व असते. जो नेता ते अचुक साधतो तो प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यात यशस्वी होत असतो. ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने उमदेवार जाहीर के ला आणि पाठोपाठ कल्याणला वैशाली दरेकर यांना तिकिट दिले. त्यापैकी विचारे विद्यमान खासदार असल्याने त्यांना संधी मिळणे नवल नव्हते. श्रीमती दरेकर यांची उमेदवारी मात्र राजकीय वर्तुळात आश्चर्याचे तरंग उमटवत आहेत. बर्याच वर्षांनी (किं बहुना प्रथमच) या मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी एखाद्या महिलेचा विचार झाला असावा. तसे पाहता उबाठाने पालघरमधून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण आणि पालघरमधील महिला मतदारांना प्राभावित करण्याची ही चाल वाखणण्याजोगी आहे. दरेकर या माजी नगरसेविका आहेत. महिला आरक्षण, सबलीकरण वगैरेच्या वल्गना होत असताना उद्धव ठाकरे यांनी कृ ती करुन आधीच उमेदवारीवरुन गोंधळ उडालेल्या महायुतीला पेचात पकडले आहे. कल्याणमधून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव घेतले जात होते. ते अचानक मागे का पडले हे कळायला मार्ग नाही. एक मात्र नक्की की ठाणे आणि कल्याणमधून आता महायुतीने वेळेचा अधिक अपव्यय न करता विनाविलंब उमेदवार जाहीर करणे त्यांच्या हिताचे ठरेल. जितके कालहरण होते तितके इच्छुक आणि त्यांचे कार्यकर्ते आशावादी होतात. संवेदनशील झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये भावनांचा उद्रेक होऊ शकतो. यवतमाळ-वाशिम येथे विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकिट, कापल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जे हिंगोलीत घडले ते ठाण्यात होणार का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या ऐवजी अचानक बाबुराव कदम कोहाळीकर यांना संधी देण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदर्ग ू तसेच नाशिक येथील जागांवरून एकमत होत नाही. या सर्व ठिकाणांवरुन महायुतीमधील कार्यकर्ते आणि इच्छुकांचे पाठीराखे यांचे मन-भेद होत रहाणार. उमेदवार यादीतोल ही दिरंगाई ‘क्रॉस-व्होटिंग’ला पोषक ठरू शकते. यदाकदाचित पराभव झालाच तर याच दिरंगाईची सबब पुढे करुन क्रॉस-व्होटिंगचे पातक लपवले जाऊ शकते. जागा-वाटपाचा सावळा गोंधळ हा राजकीय वर्चस्वासाठीचा खटाटोप आहे, हे सांगायला राजकीय निरीक्षकांची गरज नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना वारंवार आम्ही एकत्र आहोत असे सांगण्याची पाळी येत आहे. यवतमाळ-वाशिमच्या चिडलेल्या कार्यकर्त्यांनी भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यास कारण ठरलेल्या सर्वेक्षणाच्या सत्यतेबद्दलच प्रश्न उपस्थित के ला आहे. उमेदवार सर्वसंमतीने ठरला तर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद रहात नाहीत किं वा बंडखोरीची शक्यताही मावळू शकते. त्यामुळे ‘थंड करुन खा’ या मंत्राचा वापर होत आहे. मुळात ठाण्याची निवडणूक 20 मे रोजी असताना स्थानिक कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही उमेदवार लवकर घोषित व्हावा असे का वाटत आहे? याचे कारण गेली दोन वर्षे दररोज धक्कादायक बातम्या देणाऱ्या पुढाऱ्यांनी राजकीय घडामोडींचा वेग वाढवून ठेवला आहे. आता हा वेग मात्र त्यांच्यासाठी जीवघेणा झाला आहे.