पंजाबमध्ये खांदेपालटाचा निर्णय काँग्रेसच्या भलत्याच अंगाशी आलेला दिसतो. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि पदच्युत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात दोन वर्षांपासून संघर्ष सुरू होता आणि त्याची परिणीती नेतृत्व बदलात झाली. कॅ. सिंग हे तेव्हापासून दिल्लीच्या वार्या करू लागले असून भाजपाचे अमित शाह आणि इतकेच काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचीही त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना सर्वकाही मनासारखे झाले म्हणुन सिद्धु शांत बसतील असेही झाले नाही. त्यांच्या शिफारशींना नवीन मुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली याचा त्यांना राग आला आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. पंजाबमधील वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि त्याचा तडाखा पक्षाला काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत बसला नाही तरच नवल. ताज्या बातमीनुसार कॅ. सिंग पक्षातच राहणार आहेत आणि सिद्धु यांना मनवण्यात आले आहे. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्याकडे ‘आप’ आणि ‘भाजपा’ तसेच शिरोमणी अकाली दल वगैरे पक्ष नजर ठेऊन आहेत.
या सर्व घडामोडींवरून काँग्रेसमध्ये अशांतता खदखदत आहे. हे सांगण्यासाठी विश्लेषकांची गरज नाही. त्याचा पुरावा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांची गाडी फोडून आणि पक्ष-नेतृत्वावर टीका करणार्या ‘जी-२३’ गटांविरूद्ध घोषणा देऊन दिला. सिबल यांची मागणी एवढीच होती की पक्षाने तातडीने कार्यकारिणीची बैठक बोलवावी. सिबल यांच्याबाबतीत झालेल्या प्रकाराचा ज्येष्ठ नेत्यांनी निषेध केला आहे. गांधी कुंटुंबीयांची त्यावर तुर्तास तरी प्रतिक्रिया आलेली नाही.
पक्षाच्या हायकमांडचा एकेकाळी खुप दरारा असे. काँग्रेस त्याला अपवाद नाही. हा लौकिक स्व. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत प्रकर्षाने मजबूत झाला. ‘मॅडम’ चा शब्द अंतिम मानला जात असे आणि विरोध करणार्यांना अपिल नसे. ही स्थिती लोकशाहीविरोधी मानली जात असली तर शिस्तीस पुरक असे. त्याचा आविष्कार सध्या भाजपात दिसतो. अमित शाह यांना रिंगमास्टर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘हुकूमशाह’ अशी बिरूदे लावली जात असली तरी पक्षात सावळा-गोेंधळ माजत नाही,हेही तितकेच खरे! आपल्या आजीचा वारसा नातवंडांनी चालवावा, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. अर्थात त्यासाठी पक्षावर मजबूत पकड लागेल आणि ही पकड पक्षाच्या दैनंदिन कारभारापासून व्युहरचना आखण्यापर्यंत दिसायला हवी. त्याकरिता कठोर परिश्रम करावे लागतील. आणीबाणीच्या काळात ‘कठोर परिश्रमास पर्याय नाही’ असे घोषवाक्य प्रसिद्ध झाले होते. ते गांधींच्या पुढच्या पिढीला अंमलात आणावे लागेल.