राजकारणाला घराणेशाहीचा वरदहस्त लाभला की पुढच्या पिढीचे काम सुकर होत असते. अंगी गुण असो वा नसो पूर्वजांच्या पुण्याईवर वेळ मारुन नेता येते. समाज जीवनाचा दर्जा टिकवण्याचा आणि यथावकाश वाढवण्याचे काम राज्यकर्त्यांकडून अपेक्षित असते. एकूण वास्तव पहाता या कामात ही मंडळी कमी पडत असल्याचा निष्कर्ष काढावा लागेल. दुसरीकडे अशीच अपेक्षा सरकारी अधिकार्यांकडून अपेक्षित असते. इथे मात्र घराणेशाही चालत नाही आणि गुणवत्तेशिवाय या क्षेत्रात कोणाची डाळही शिजत नाही. अशा क्षेत्रात कार्य करण्याची संधी समाजातील गुणवंतांना मिळते ती त्यांच्या प्रज्ञेच्या आधारावरच. युपीएससी आणि एमपीएससी या अत्यंत कठीण परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना लोकसेवा करण्याची नामी संधी मिळाली आहे. त्यात केवळ त्यांचे कठोर परिश्रम आणि चिकाटी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी वशिलेबाजीच्या वा घराणेशाहीच्या कुबड्या वापरलेल्या नाहीत. त्यामुळे समाज-जीवनाचा स्थर उंचावण्याचे काम ही मुले-मुली करतील अशी अपेक्षा आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या गुणी विद्यार्थ्यांबद्दल माध्यमातून मजकूर प्रसिद्ध होत आहे. त्यांच्या अद्वितीय कामगिरीत त्यांच्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांचाही हातभार दिसतो. विशेष म्हणजे अनेक मुले अति सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून आले आहेत. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पैसा हा निकष गळून पडलेला दिसतो. या मुलांच्या आई-वडिलांची बड्या मंडळींमध्ये ऊठबस आहे म्हणून त्यांना यश मिळाले असेही नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ध्येयासक्ती यांच्या आधारेच त्यांना यश प्राप्त झाले आहे. या मुलांवर असलेले कौटुंबिक संस्कार हेही महत्त्वाचे आहे. त्यांना पैशांचे मोल ठाऊक आहे. कर्तव्याची जाणीव आहे, जबाबदारीचे भान आहे, त्यांच्या डोळ्यात एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न आहे, त्यांच्या मनात भ्रष्टाचाराविरुद्ध राग आहे, अन्यायग्रस्त जनतेबद्दल कणव आहे अशा गुणांची शिदोरी घेऊनच ते पुढच्या प्रवासास निघाले आहेत.
सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रतिमेबद्दल जनतेचे काय मत आहे हे या यशस्वी विद्यार्थ्यांना ठाऊक नसेल असे अजिबात नाही. आपण ही प्रतिमा सुधारली पाहिजे ही ऊर्मी त्यांनी बाळगण्याची गरज आहे. राजकीय इच्छाशक्ती ही स्वार्थकेंद्रीत असते, परंतु प्रशासकीय इच्छाशक्ती ही जनताकेंद्रित असेल तर कल्याणकारी व्यवस्था निर्माण होऊ शकते. या मुलांकडून समाजाची ही अपेक्षा आहे. त्यांना लाभलेले यश ते मातीमोल होऊ देणार नाहीत असे वाटते.