फडणवीसांचे बोल

सवंगपणा ज्या क्षेत्राचा स्थायीभाव बनला आहे, त्या राजकारणात खरे बोलून कटुता वाढवणे आणि टीकेचे लक्ष्य बनणे अशी दुहेरी जोखिम क्वचितच कोणी नेता घेताना दिसतो. त्यामुळे सरकारकडून अनेकदा खिरापतीसारखी वाटली जाणारी नुकसान भरपाई तिजोरीची स्थिती पाहून करावी, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. स्वत:च्याच सरकारला आरसा दाखवणारे नेते दुर्मिळ होत चालले असून श्री.फडणवीसांच्या भूमिकेवर कोणती प्रतिक्रिया उमटते हे पहावे लागेल. राजकारणातील ही संवेदनशील बाब परिपक्वतेने हाताळली जावी ही मात्र सर्वसामान्यांची अपेक्षा रहाणार. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, यात संदेह नाही. आधीच रांजलेल्या-गांजलेल्या बळीराजाची निसर्गानेक्रूर चेष्टा केली असताना त्यांना भरपाई देऊन पाठीशी उभे राहणे हे माणुसकीला धरुन होते. त्यामुळे शेतकर्यांना
साडे तीन हजार कोटींची मदत शासनाने दिली. याच काळात एसटी महामंडळाचा संप चिघळला आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. सरकारने वेतनापोटी तीनशे कोटी रुपये दिले आणि त्यांना दिलासा दिला. सत्तांतर झाल्यामुळे नव्या सरकारवर टीकेचे आसूड ओढण्याची संधी विरोधी पक्ष सोडत नसतात. या दबावाखाली सरकारने हात सैल ठेवला. परंतु त्याचे दूरगामी परिणाम विकास प्रकल्पांवर होतील याचेत्यांना भान राहिले नाही. श्री. फडणवीस यांनी ते आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकार चालवणे ही तशी तारेवरची कसरत असते. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं,’ अशी त्यांची अवस्था असते. महत्त्वाचे म्हणजे विरोधी पक्षात असताना मदतीचा रेटा लावणारे सत्तेत आले की वस्तुनिष्ठ विचार करु लागतात. श्री. फडणवीस हे अभ्यासू नेते असल्यामुळे ते वास्तववादी नाहीत असे म्हणता येणार नाही. परंतु
या वास्तवासाठी अप्रियतेच्या वास्तवावर कोण चालेल? श्री. फडणवीस यांनी हा मार्ग निवडला असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे लागतील. ज्यांनी सत्तेतबसवले, ते उतरवूही शकतात हे वास्तवही लक्षात घ्यावे लागते. त्यातून सुवर्णमध्य शोधण्याकडे नेत्यांचा कल असतो. परंतु जेव्हा तिजोरीतच
खडखडाट असतो तेव्हा हे शहाणपण कागदावरच राहत असते. श्री. फडणवीस नव्या सरकारचे प्रमुखमार्गदर्शक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्यावर मदार आहे. या दोघांनाही विरोधी पक्षाच्या रोशाला आणि भडकलेल्या जनतेला सामोरे जाणे परवडणारे नाही. त्यासाठी त्यांना जनतेशी संवाद साधून, त्यांना विश्वासात घेऊन,
आर्थिक मदतीबरोबर काही धोरणात्मक बदल करुन, दूरदृष्टीने दिलासा देणारे उपाय शोधावे लागतील. स्वत:च्याच मंत्र्यांना आरसा दाखवला हे चांगले झाले. परंतु आरशात स्वतःची गोजिरवाणी प्रतिमा बघण्यात आणि तिच्या प्रेमात पडणाऱ्या नेत्यांना फडणवीस यांचा उपदेशपर डोस पचेल काय, हा खरा प्रश्न आहे!