कोंडी खड्ड्यातून बाहेर पडेल?

गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेला वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकाराकडे सर्वांचे बारीक लक्ष आहे. विशेष म्हणजे ते या समस्येच्या मुळाशी जाऊ पहात आहेत आणि केवळ खड्ड्यांमुळे ही परिस्थिती उद्भवते या नेहमीच्या सबबीला ते चाट देत आहेत. पावसाळा, रस्त्यांची दुर्दशा आणि त्याचा परिपाक वाहतूक-कोंडी या त्रैराशिकात मोठ्या खुबीने अडकलेला (की अडकवलेला?) हा प्रश्‍न या लघुदृष्टीच्या कोंडीतून बाहेर पडला तरच वाहनचालकांना सुटकेचा नि:श्‍वास सोडता येईल.
इमारत कोसळली, वादळाचा तडाखा बसला, पूर आला किंवा तत्सम गंभीर घटना घडली तरच मंत्र्यांचे पाय घटनास्थळाकडे वळत असतात. परंतु ना. शिंदे यांनी वाहतूक-कोंडीसाख्या दैनंदिन समस्येकडे आपत्ती म्हणुन पहाण्याचा प्रयत्न केला, हे उत्तम झाले. ठाण्याचे पालकमंत्रीपद भूषविताता नगरविकास खात्याची धुरा वाहणार्‍या ना. शिंदे यांनी अवजड वाहतूकीचे नियमन करण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो स्वागतार्ह आहे. न्हावा-शेवा बंदर असो की भिवंडीतील गोदामे या सर्व सुविधांचा वापर देशभरातील व्यावसायिक-उद्योजक प्रचंड मोठ्या प्रमाणात करीत असतात.या परिसरातील लाखो हातांना रोजगार देताना आर्थिक पर्यावरणाचा तोल सांभाळत असतात. कोट्यवधी रुपयांची मालवाहतूक करणारे ट्रक वा कंटेनर या कोंडीत अडकतात तेव्हा केवळ त्यांच्या इंधनाचा अपव्यय होत नसतो तर त्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होऊन उत्पादन, आयात-निर्यात वगैरेंबाबत असलेली साखळी तुटत असते. या अवजड वाहनांमुळे शहरातील दळणवळण यंत्रणा कोलमडत असते. त्या व्यापक दृष्टीकोनातून या समस्येकडे पाहिले गेले तरच त्याचे दूरगामी फायदे आणि कायस्वरुपी तोडगा दृष्टीक्षेपात येईल. ना. शिंदे यांनी शेकडो हेक्टर रिकामे भूखंड वाहतुकीच्या नियमनासाठी वापरण्याचा जो निर्णय घेतला आहे तो सुरळीत वाहततुकीस अनुकूल ठरेल.
महामारीमुळे अवघ्या देशाची आर्थिक घडी विस्कटली असून मंदीचे काळेकुट्ट ढग जमा झाले आहेत. एकीकडे या अभूतपूर्व प्रकोपावर मात करताना वाहतुकीसारखी पायाभूत सुविधा नीट असेल तरच परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकेल. उत्पादन प्रक्रिया असो की कार्यालयीन कामकाज वाहतूक-कोंडीमुळे बाधित होता कामा नये. या घटकांच्या कार्यक्षमतेवरच पुढचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशा वेळी कोणत्याही प्रश्‍नांच्या मूळाशी जायला हवे. एमएमआरडीए परिसराची व्याप्ती लक्षात घेता आणि त्यांचे योगदान पहाता इतके दिवस हलक्यात घेतल्या जाणार्‍या वाहतूक कोंडीला नगरविकास मंत्र्यांनी अक्षरशः खड्ड्यातून बाहेर काढले असेच म्हणावे लागेल.