सायकलस्वारांची सुरक्षा

एकीकडे सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा विचार जनमानसात मूळ धरत असताना सायकलस्वारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होणाऱ्या घटना घडत आहेत. नवी मुंबईत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अवतार सैनी यांच्या सायकलला बसलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला.

श्री.सैनी हे आजच्या युगात प्रसिद्ध असलेल्या पेंटियम संगणकाच्या निर्मिती प्रकल्पातील मुख्य नाव होते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सैनी यांच्या सायकलला नवी मुंबईतील पाम बिच रस्त्यावर एक भरधाव गाडीने मागून धडक दिल्यामुळे हा जीवघेणा अपघात झाला. वाहनचालकास पोलीस पकडतील, पुढील कायदेशीर कारवाई होईल, सैनी यांच्या नातेवाईकांना भरपाईही मिळेल. परंतु हे सर्व सोपस्कार पूर्ण झाले तरी सैनी जीवंत होणार नाहीत, उलटपक्षी त्यांच्यासारखे हजारो सायकलवीर दररोज मृत्यूशी झुंज देत राहतील. याकरिता स्थानिक प्रशासनाने तातडीने खबरदारीची पावले उचलायला हवीत.

सध्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपापली अर्थसंकल्पे सादर करीत आहेत. कोणी त्याचे वर्णन ‘ग्रीन बजेट’ असेही करीत आहेत. पर्यायवरण केंद्रीत अर्थसंकल्प मांडताना वृक्षारोपण, तलावांचे संवर्धन, हवेतील प्रदूषण कमी करण्याची उपाययोजना, ई-वाहने, प्लास्टिकविरोधी मोहीम अशी पावले उचलली जात आहेत. गेल्या काही वर्षात त्यात सायकलच्या वापरावर भर याचाही उल्लेख होऊ लागला आहे. मग त्या अनुषंगाने सायकल ट्रॅक, सायकलची उपलब्धता वगैरे बाबींवर तरतूद केली जाते. महापालिकांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. परंतु त्याची परिणामकारकता कागदावरच राहत असल्याचे दिसते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रचलित रस्त्यांतून एक मार्गिका फक्त सायकलस्वारांसाठी राखून ठेवणे अशक्य होत आहे. ठाण्यात तसा प्रयोग झाला. परंतु तोही एकाच ठिकाणी! तिथेही हा सायकल-मार्ग सलग नाहीच. महापालिकेच्या त्यांच्या काही अडचणी असतील. इच्छा आहे परंतु अंमलबजावणी शक्य नाही, असा काहीसा अनुभव सर्वच शहरांना येत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी विचारमंथन व्हायला हवे. सायकलपटूंच्या संघटनांची संख्या वाढू लागली आहे. त्यांच्या प्रतिनिधींकडून सूचना मागवायला हव्यात. सध्याच्या पदपथांवर काही उंचीवर सायकल-मार्गिकांची निर्मिती होऊ शकते का, हे तांत्रिक सल्लागारांकडून तपासून घ्यावे. त्यामुळे सलग मार्गिका उपलब्ध होऊ शकेल. त्यावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी ठराविक अंतरावर रॅम्प बांधता येतील.

ही वा अशा काही नाविन्यपूर्ण कल्पनांचा विचार झाला तर सायकलच्या वापराला प्रोत्साहन मिळू शकेल. अपघातविरहीत सायकल प्रवास अधिक लोकांना या पर्यावरणस्नेही माध्यमाचा वापर करण्यास उद्युक्त करू शकेल. ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात या महत्वपूर्ण बाबीचा जरूर विचार करावा.