विकासाचा सात-बारा !

गेल्या काही वर्षात ठाणे शहराच्या उत्तरेकडे शहरीकरण झपाट्याने झाले. बघता – बघता नवीन ठाणे गृहसंकुलांनी व्यापून गेले आणि तेथील जमिनीची क्षमता संपताच विकासकांनी मोर्चा भिवंडीच्या दिशेकडे वळवला. तिसरे ठाणेही आकार घेऊ लागले आणि हा सारा खेळ शहरात जुन्या- मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणारे रहिवासी थोडेसे आशेने आणि बऱ्याचशा हताशपणे पाहत होते. त्यांच्या पुनर्विकासात सात- बाऱ्यावरील शेती ही नोंद त्यांना विकासापासून वंचित ठेवत होती. आसावरी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हा अन्याय गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आणला आणि सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. सात-बाऱ्यांवर आता फेरफार होणार असून त्यांना बिगर-शेती ठरवण्यात येणार आहे. ४०-४५ वर्षे जुन्या इमारती त्यामुळे कात टाकतील आणि तेथील रहिवाशांच्या जीवनात आशेची पहाट उगवेल. 


शहरांचा विकास हा संतुलित असावा असे नियोजनकर्त्यांचे म्हणणे असते. ठाण्याच्या बाबतीत हे नियोजनकर्ते कुठे होते आणि असले तर त्यांचे ऐकावे असे प्रशासनाला का नाही वाटले हे विषय यानिमित्ताने पुढे आले आहेत. संतुलित विकास हा केवळ मूलभूत सुविधा पुरवण्यापर्यंत मर्यादित असतो असा गोड गैरसमज या प्रक्रियेशी निगडित सर्वांनी करून घेतला. त्यामागे अर्थकारण होते. काही जणांचे हीतसंबंध होते आणि अर्थातच स्वार्थ होता. नवीन शहराचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा जुन्याची हेतुपुरस्सर उपेक्षा होते. तेव्हा म्हणजे नौपाड्यात घर घेण्याऐवजी काही किलोमीटर दूर घोडबंदर रोडवर घेण्याची परिस्थिती निर्माण करणे. हे काम ‘शेती’चा शिक्का असलेल्या सात-बाऱ्यांनी चोख बजावली. शहरातील छोट्या बिल्डर मंडळींना संपवण्याचा कट या सात-बाऱ्यांत होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. 


मागणी वाढली की त्या तुलनेत पुरवठा करावा लागणार हा व्यवस्थापन शास्त्राचा नियम बांधकाम व्यवसायाला लागू होतो. मागणी घोडबंदर रोडवरच वाढावी, अशी व्यूहरचना शहरविकासाशी  निगडीत  सर्व यंत्रणेने केली. नौपाड्यात, पाचपाखाडीत किंवा कोपरीत घरे घेणारे सर्व दूर-दूर जाऊ लागले ते या सदोष सात-बाऱ्यामुळे. 


आता ही समस्या दूर झाली आहे. त्यामुळे सहाजिकच रहिवासी आणि विकासक यांच्यात आनंदाचे तरंग उमटत असतील. परंतु अशी मोकळीक नवीन जबाबदाऱ्यांनाही आमंत्रण देत असते. सुमारे १४०० इमारतींचा पुनर्विकास म्हणजे जुन्या शहरातील पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वाहनांचे पार्किंग, मलनिस्सारण, रुंद रस्ते आदी सुविधांची अपेक्षा. त्यासाठी विचारांच्या सात-बाऱ्यांतही फेरफार करावा लागणार आहे.