महानगरी मुंबईच्या सावलीचा शाप भोगणाऱ्या ठाण्याची आज त्यातून मुक्तता झाली. श्री.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल करून भाजपाने विश्वनिर्मितीच्या क्षणी झालेला ‘बिग बॅंग’ महास्फोट घडवला. या महाभूकंपाच्या हादऱ्यांनी केवळ राज्यातीलच नाही तर देशाची राजकीय भूमी दुभंगली आहे.
गेल्या दहा दिवसांच्या घडामोडींना इतके नाट्यमय वळण मिळेल असे राजकीय निरीक्षकांनाही वाटले नव्हते.
या सर्व वेगवान आणि अनपेक्षित घटनांचा शिवसेनेवर काय परिणाम होईल, हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल. शिंदे यांच्या कृतीबद्दल शिवसैनिकांच्या संमिश्र भावना होत्या.
भाजपाने मोठ्या (?) मनाने मुख्यमंत्री पद देऊन श्री. शिंदे यांच्याबद्दल निर्माण झालेली नाराजी कमी होईल, याची काळजी घेतलेली दिसते. मोठा आणि छोटा भाऊ या वादामुळेच युती तुटली असताना भाजपाने आमदारांची संख्या जास्त असूनही शिंदे यांना मान देऊन वेगळाच संदेश दिला आहे. यामागे मुत्सद्दीपणा दिसतो, परंतु भाजपात त्याची कोणती प्रतिक्रिया उमटेल हे सांगता येणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असताना श्री.शिंदे यांच्या गळ्यात ती माळ पडली. त्याचे राजकीय पडसाद उमटत रहाण्याची शक्यता आहे. अर्थात त्याचा विचार भाजपा हायकमांडने केला असणारच. सत्तांतर त्यांच्या मोठ्या प्लॅनचा भाग असू शकतो. शिवसेनेने तो वेळेत समजून घेण्याची गरज आहे.
ठाण्याचे राजकीय महत्त्व दोन कॅबिनेट दर्जाची मंत्रीपदे मिळाल्यामुळे वाढले होतेच. मुख्यमंत्रीपदामुळे त्यावर कळस चढला. श्री. शिंदे यांची राजकीय कारकीर्द स्वप्नवत आहे. शाखाप्रमुख ते नगरसेवक, पुढे सभागृह नेतेपद आणि चार वेळा आमदारकी अशा टप्प्या-टप्प्याने ते पुढे गेल्यामुळे जनतेची नाडी ते चांगले ओळखून आहेत. प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोटी त्यांच्यापाशी आहे. त्याचा फायदा त्यांना नवीन जबाबदारी पार पाडताना होईल.
कोरोनाने राज्याच्या विकासात खोडा घातला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असताना श्री. शिंदे यांना संधी मिळाली आहे. अनुकूल वातावरणात ते विकासाचे अनुशेष भरून काढतील ही अपेक्षा आणि शुभेच्छा.