अनुभवांची शिदोरी घेऊन, अर्थात तोंडाला मास्क लावून आपण सारेच नवीन संवत्सराला सामोरे जाण्यासाठी सज्ज झालो आहोत. अनुभवांना ओझे मानणे चुकीचे असते कारण ते माणसाला समृद्ध करीत असतात आणि जीवनाला अधिक सक्षमपणे सामोरे जाण्याचा मार्ग दाखवत असतात. अनुभवातून जो शिकत नाही तो मात्र चुकांचे ओझे वाहत राहतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षण ‘ऑनलाईन’ सुरु असले तरी जे लौकिक अर्थाने विद्यार्थी नाहीत त्यांचे शिक्षणही सुरु होते. जीवनाच्या शाळेतील ‘ऑफलाईन’ शिक्षणाने वर्गाच्या चार भिंतींबाहेरच्या जगाची ओळख प्रत्येक मानवास करून दिली. २०२१ ला निरोप देताना कटू आठवणींना अंत नाही. पण म्हणून २०२२ चे स्वागत करताना मनातील हे मळभ दूर करणे शहाणपणाचे ठरेल. श्री श्री रविशंकर म्हणाले त्याप्रमाणे सरत्या वर्षात अकाली पाऊस खूप झाला आणि म्हणूनच आपण नव्या वर्षात ऊन अधिक पडावे अशी प्रार्थना करू या.
ओमायक्रॉनमुळे सरकार हवालदिल होणे स्वाभाविक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटांनी जो रुद्रावतार दाखवला त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रुग्णालयांतील खाटांची मुबलकता, प्राणवायू वा औषधांचा पुरवठा, व्हेन्टिलेटरसारख्या सुविधा यांबाबत कोणतीही कसर राहणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. अशा वेळी जनतेचेही काही उत्तरदायित्व राहते आणि त्यात कसूर होता काम नये. आजही लस घेण्याबाबत उदासीनता दाखवली जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता असलेले निर्बंध पाळले जात नाहीत. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये जबाबदार नेतेच त्याची पायामल्ली करीत आहेत. लग्नसमारंभ आणि पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणेच गर्दी खेचत आहेत. बाजार मंड्यांत नागरिक असे काही संचार करीत आहेत जणू कोरोनाने जगाचा निरोप घेतला असावा. ही बेफिकिरी एकीकडे मुलांना शाळेत पाठवण्याचा मुद्दा निघताच काळजीत रूपांतरित होत आहे. हे भंपक वागणे नवीन वर्षात पदार्पण करताना सोडून द्यावे लागेल. कोरोनाने धडा शिकवला, पण आपण काही शिकलो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. याचे उत्तर अर्थातच नकारात्मक आहे कारण अजूनही आपण परिस्थितीनुरुप कसे वागायचे हे शिकलेलो नाही. आपल्या प्राधान्यक्रमात वैचारिक गोंधळ आहे, परिपक्व होण्याऐवजी आपण पटकन वैफल्यग्रस्त होत आहोत. एकमेकांवर विश्वास (अगदी डॉक्टरांवरसुद्धा) ठेवायला शिकलेलो नाही.
आपल्याला जीवनाचे महत्वच जणू कळले नसल्याची ही व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्यातून आपली सर्वांची मुक्तता झाली तर २०२२ मध्ये दररोज उगवणाऱ्या सूर्याचा कार्यकारणभाव समजेल! अन्यथा कवी अशोक नायगावकरांच्या मते तोही खिन्नपणे म्हणू लागला होताच की, दिवस ढकलतोय आणखी काय? ठाणेवैभवच्या परिवारातर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !