अफाट आणि अचाट

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते एवढ्या दोन विशेषणांत ज्या व्यक्तीमत्त्वाला बंदिस्त करता येत नाही. अशा बहुआयामी डॉ. अनिल अवचट यांचे निधन त्यांच्या तमाम चाहत्यांच्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण करणारी आहे. साधा, सात्विक, सहृदयी, सुस्वभावी, संवेदनशील अशा असंख्य गुणांचा त्यांना भेटल्यावर साक्षात्कार यावा, असे हे व्यक्तीमत्त्व ‘ठाणवैभव’ परिवारासाठी फार आदरणीय होते. ‘ठाणेवैभव’ कार नरेंद्र बल्लाळ स्मृतीव्याख्यानमालेत डॉ. अवचट यांनी अनेक वर्षांपूर्वी गुंफलेले पुष्प आजही रसिक ठाणेकरांच्या मनात टवटवीत आहे. त्यांच्यातील निरागसतेचा दरवळ आजही जीवंत आहे. साहित्यिक हा सर्वसामान्यांच्या भावनांना शब्दरूप देत असतात. पण डॉ. अवचट यांनी केवळ त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांना बोलते केले नाही तर ते झाड-फुलांशी, प्राण्यांशीही बोलत असे. ही समरसता सहजासहजी येत नसते. त्यासाठी मनात कोणतीही किल्मिषे जपून ठेवता येत नाही. ‌मानवकल्याण आणि सुह्रुदयता यांचाच ध्यास अवचटांच्या लिखाणातून पाझरत असे. मन आणि हृदय आरसपानी असावे लागते. तुम्हाला आर-पार बघण्याची दिव्यदृष्टी असेल तर चांगुलपणाचं सुक्ष्मपणे तुम्ही टिपू शकतात. डॉ. अवचटांनी ही किमया साध्य केली होती. त्यांच्या साहित्यनिर्मितीचे तेच अधिष्ठान होते. व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. संपूच नये असे त्यांचे ते भाषण ठाणेकरांना भावले कारण एक निर्मळ मनाने साधलेला तो सुसंवाद होता. कोणताही अभिनिवेश नाही. कोणतीही ऐट नाही. साहित्यिक असल्याचा बडेजाव नाही. पाय घट्ट जमिनीत असलेला आपलाच आवाज परकाया प्रवेश करून हितगुज करीत असावा असा तो विलक्षण अनुभव आम्ही आजही जतन करीत आहोत.
‘मुक्तांगण’ सारखा उपक्रम म्हणजे अवचट दाम्पत्याने महाराष्ट्रावर केलेले मोठे उपकार आहेत. व्यसनाधिनतेमुळे माणुसपण हिरावले जाता कामा नये ही तळमळ डॉ. अवचट आणि डॉ. अनिता अवचट यांनी या संस्थेच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरली. या व्यतिरिक्त त्यांच्या सहज, ओघवत्या निवेदन शैलीमुळे त्यांचे वृत्तांतकथन रोचक होत असे. डॉ. अवचट यांना ऐकणे ही एक पर्वणी असे. केवळ मनोरंजन नाही तर नवे ज्ञान, नवा दृष्टीकोन त्यांच्या बोलण्यातून उपस्थितांना मिळत असे. पत्रकारितेच्या रूक्ष बातम्यांपलिकडे जाऊन वास्तवाचे परखड दर्शन त्यांची लेखणी करून देत असे. हमाल, भंगी, वेश्या, ऊसतोडणी कामगार, धार्मिक भोंदुगिरीने सोंग वाजविणारे भामटे यांच्या शब्दचित्र त्यांच्या ‘माणसं’ या पुस्तकातून पानोपानी घडते. हे पुस्तक मराठी साहित्यातील मैलाचा दगड आहे. विदारक सामाजिक वास्तव सादर करतानाही मनातील चित्रकार, शिल्पकार, ओरोगामीकार तरलपणे व्यक्त होत होता.
ते उत्तम बासरीही वाजवायचे. डॉ. अवचट यांनीच लिहिलेली ही कविता त्यांच्या जीवनोत्कट दृष्टीचा साक्षात्कार देतेच. पण त्यात दडलेले तत्त्वज्ञान हेही बरेच काही सांगून जाते.
आता उतार सुरू
किती छान
चढणे ही भानगड नाही
कुठलं शिखर जिंकायचं नाही
आता नुसता उतार
समोरच, झाडीनं गच्च भरलेले दृश्य
दरीतून अंगावर येणारा आल्हाददायक वारा
कधी धुकं, तर कधी ढगही
टेकावं वाटलं तर टेकावं
एखाद्या दगडावर
बसलेल्या छोट्या पक्ष्याशी
गप्पा माराव्यात
सुरात सूर मिसळून
अरे, हे सगळं इथंच होतं?
मग हे चढताना का नाही दिसलं?
पण असू दे
आता तर दिसतंय ना
मजेत बघत
उतरू हळूहळू
मस्त मस्त उतार!