आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
मुंबई : एकीकडे शिवसेनेतील आऊटगोईंग संपायचं नाव घेत नाही तर दुसरीकडे त्यांच्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याचं चित्र आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला असून उद्या त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा 1,034 कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.
पीएमसी बँक घोटाळ्यातही आलं होतं नाव
2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुरु आशिष कंपनीचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून 2010 साली संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये कर्ज म्हणून देण्यात आले होते. या पैशातून संजय राऊत यांनी मुंबईतील दादर परिसरात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांचे अलिबागमध्ये आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांचा फ्लॅटचा समावेश होता. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच ईडीनं यापूर्वी प्रवीण राऊत यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं. प्रवीण राऊत, सारंग वाधवान, एचडीआयएलचे राकेश वाधवान, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन आणि इतरांची आरोपपत्रात नावं आहेत.