ठेकेदारांची बिलेही २५० कोटींवर
ठाणे : जून २०२२ पर्यंत मालमत्ता करापोटी महापालिकेच्या तिजोरीत केवळ ११२ कोटी रुपये जमा झाले आहेत. या बिकट परिस्थितीत महापालिकेचे दायित्व ३,८०० कोटींवर गेले असून दुसरीकडे ठेकेदारांची देणीही २५० कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठेकेदारांना बिले मंजूर करून घेताना नाकी नऊ येणार आहेत. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर विकासकामे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
१ एप्रिल ते मार्च २०२१ या कालावधीतील २५ कोटींची आणि मेन्टेनस व इतर खर्च असा मिळून ४० कोटींच्या आसपासची बिले ऑगस्टपर्यंत देण्याची पालिकेने तयारी केली आहे. शहरात सध्या एमएमआरडीएकडून आलेल्या २४० कोटींच्या बदल्यात शहरातील १२७ रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. तर १४० कोटींमधून चौक सुशोभिकरण व इतर कामे सुरु आहेत. या पलिकडे जाऊनही काही कामे शहरात सुरु आहेत.
यंदा मालमत्ता कर विभागाला ७०० कोटींच्या आसपासचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार या विभागाने एप्रिल ते 8 जूनपर्यंत ११२ कोटींची वसुली केली आहे. त्यातही ५०० चौरस फुटांच्या घरांवरील सामान्य करात माफी देण्यात आली असली तरी त्याचा सध्यातरी कुठेही परिणाम जाणवला नसल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु हा विभाग सोडला तर इतर विभागाकडून अद्यापही वसुली झालेली नाही. टीएमटीला दरमहा १२ कोटी देऊन पालिकेला टिएमटीचा देखील गाडा हाकावा लागत आहे. त्यानुसार महिनाकाठी परिवहनला १२ कोटी पालिकेकडून अनुदान दिले जात आहे. यात पगारासाठी ८ कोटी आणि परिचलनासाठी ४ कोटी असा त्यात खर्च अंतर्भूत केला आहे. त्यामुळे महापालिकेची ही आर्थिक घडी कशी बसवायची असा मोठा प्रश्न ठाणे महापालिकेला पडला आहे.