ठाणे: शहराची वाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन सेवेचे बदलते रुप लवकरच ठाणेकरांना अनुभवयास मिळणार आहे. ‘ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज’ अशा पर्यावरणपूरक ई- बसेस लवकरच परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
स्वच्छ वायू कृती आराखड्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (17 जानेवारी 2023) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त तुषार पवार, अनघा कदम, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी व परिवहन सेवेचे अधिकारी उपस्थित होते.
ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रीकल बसेस उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे, यात अत्याधुनिक ई बसेस परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.
स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत महापालिकेस सन 2020-21, 2021-22 व 2022-23 साठी अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानातंर्गत 123 ई बसेस खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. जानेवारी 2023 अखेरपर्यत 32 ई बसेस प्राप्त होणार असून जून 2023 पर्यत उर्वरित 91 ई-बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत. या बसेस दिलेल्या वेळेतच प्राप्त होतील याची दक्षता घ्यावी, जर याकामी विलंब झाला तर करारनाम्यातील अटीनुसार ठेकेदारास दंड आकारला जाईल असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
नव्याने उपलब्ध होणाऱ्या बसेस महापालिका क्षेत्रात सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या डिझेल बसच्या मार्गिकेवर चालविण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. जेणेकरुन नागरिक सार्वजनिक वाहतूकीवर भर देतील व परिवहन सेवेचे उत्पन्न प्रति किलोमीटर वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुदानाचा वापर जास्तीत जास्त ई-बसेस व इतर पर्यावरणपुरक कामांसाठी करण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी दिल्या.
साफसफाई यंत्रे खरेदी करण्याचे निर्देश
शहरातील मोठ्या काँक्रिटच्या रस्त्यावर यंत्रांच्या सहाय्याने साफसफाई सुरू केली तर हे रस्ते स्वच्छ ठेवण्यामध्ये अधिक मदत होईल.बी यंत्रे खरेदी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. स्वच्छ वायू कृती आराखडयाअंतर्गत सर्व स्मशानभूमींमध्ये इलेक्ट्रीक आणि गॅस शवदाहिनीची उपलब्धतता करुन द्यावी असा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देखील आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.