उत्तन येथील तीन दीपस्तंभाचे खा. विचारे यांच्या हस्ते जलपूजन

भाईंदर : भाईंदरच्या कोळी बांधवांनी केलेल्या मागणीनुसार उत्तन समुद्रात असलेल्या सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडक येथे रात्रीच्यावेळी मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतत असताना काळोखात त्या खडकांवर बोट आदळून अपघात होतात. अपघात दुर्घटना टाळण्यासाठी या तीनही ठिकाणी दिपस्तंभ उभारण्यात येणार आहे. दीपस्तंभ उभारण्याच्या कामाचे जलपूजन शनिवारी करण्यात आले.

उत्तन येथील समुद्रात बांधण्यात येणारे हे तीन दिपस्तंभ जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून करण्यात येणार आहेत. उत्तन किनारपट्टीवरील मच्छिमार समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. समुद्रात मच्छीमार मासे बोटीत भरून रात्रीच्यावेळी किनारपट्टीकडे येतात. त्यावेळी रात्रीच्या काळोखात समुद्रातील खुट्याची वाट, सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडक येथील खडकावर बोट आदळून बोटीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी खा. राजन विचारे यांच्याकडे त्या खडकांच्या ठिकाणी दिपस्तंभ बांधण्याची मागणी केली होती.

ही मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्य होऊन २०१८-१९ मध्ये जिल्हा नियोजन विभागाकडे पाठपुरावा करून ७२ लाखांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. त्यातून सुरुवातीला खुट्याची वाट येथे दोन वर्षांपूर्वी दीपस्तंभ उभारण्यात आला. यानंतर मच्छीमारांनी सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडकांच्या ठिकाणी सुद्धा दीपस्तंभ उभारण्याची मागणी खा. विचारे यांच्याकडे केली. त्याची दखल घेत खा. राजन विचारे यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीकडून तीन कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर करून घेतला असून सदर दीपस्तंभ बांधण्यासाठी जलपूजन विधी खा. राजन विचारे यांच्यातर्फे करण्यात आला आहे.