जिल्ह्यात दुरंगी तिरंगी लढती; उमेदवारांना निकालाची धास्ती

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यात बहूतेक मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट तर काही ठिकाणी मनसे आणि प्रबळ बंडखोरांमुळे तिरंगी लढत होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कोपरी- पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा, मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड या एकूण १८ विधानसभा मतदारसंघामध्ये २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये १७ विद्यमान आमदार आहेत. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असली तरी पाच ठिकाणी मनसेनेही उमेदवार उभे केले आहे. याशिवाय १८ पैकी किमान नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोर उभे असल्यामुळे काही अपवाद वगळता सर्वच मतदारसंघामध्ये तिरंगी, चौरंगी लढत होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघाचाही समावेश आहे. पाच मतदारसंघात शिवसेनेचे दोन गट आणि तीन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आहेत. तर दुसरीकडे तब्बल १० मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशी लढत आहे. त्यामुळे ही लढाई वर्चस्व विरुद्ध अस्तित्व अशी ठरणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा वरचष्मा आहे. येथील सहा पैकी दोन शिंदे गट आणि तीन भाजप असे पाच आमदार हे महायुतीचे आहेत. ठाणे लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे हे ठाणे शहर विधानसभेत विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. केळकर हे विजयाच्या हॅट्रीकच्या जवळ आहेत. मात्र त्यांचा सामना ठाकरे गटाच्या राजन विचारे आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासोबत आहे. भाजपच्या ताब्यात गेलेला ठाण्याचा गड परत मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजनावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे. कोपरी-पाचपाखाडीमध्ये शिष्य विरुद्ध गुरु बंधू असा सामना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने दिघे कार्ड खेळत नवीन चेहरा असलेल्या केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे बंडखोर मनोज शिंदेही मैदानात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरणार आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार गणेश नाईक विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एम. के. मढवी अशी लढत आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे विजय चौघुले यांनी बंडखोरी केल्यामुळे पुन्हा शिवसेनेच्या मतांचे विभाजन निर्णायक ठरणार आहे.
बेलापूरमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक असा थेट सामना रंगणार आहे. दुसरीकडे ओवळा-माजिवाडा येथे चौथ्यांदा निवडणूक लढवणारे शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटचे नरेश मणेरा आणि मनसेचे संदीप पाचंगे असा तिरंगी सामना आहे. मीरा-भाईंदरमध्ये अपक्ष विद्यमान आमदार गीता जैन यांचा सामना भाजपच्या नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांच्यासोबत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे चार तर महाविकास आघाडीचा आणि मनसेचा प्रत्येकी एक आमदार आहे. मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ असला तरी यावेळी ही निवडणूक त्यांच्यासाठीही वर्चस्वाची ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने दिपेश म्हात्रे यांना मैदानात उतरवले आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघात विजयाचा चौकार मारण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड मैदानात आहेत. एकेकाळी त्यांचा शिष्य म्हणून ओळखले जाणारे नजीब मुल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विजयासाठी खासदार डॉ. शिंदेही मैदानात उतरले आहेत. कल्याण ग्रामीणमध्येही अटीतटीची लढत पहायला मिळणार आहे. मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईर आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि मनसेची ताकद असल्याने मतदान कुणाच्या पारड्यात पडते हे पहावे लागेल. कल्याण पूर्वमध्ये भाजपने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे धनंजय बोडारे आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर महेश गायकवाड आहेत. महेश गायकवाड कुणाची मते खाणार यावर येथील विजय ठरणार आहे. उल्हासनगरमध्ये विद्यमान आमदार कुमार आयलानी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओमी कलानी असा थेट सामना आहे. पप्पू कलानी राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहेत. तर लोकसभेला कलानी यांनी शिंदे गटाला खुली मदत केली होती. त्यामुळे ही मदत त्यांना फळणार का हे पहावे लागेल. अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखेडे असा थेट सामना आहे. डॉ. किणीकर यांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर सभा घेतली होती. तर खासदार डॉ. शिंदे हे सुद्ध फिल्डींग लावून आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या विशेषत: भाजपच्या ताब्यातून हिसकावल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही धोक्याची घंटा समजली जाते. सध्या येथे पाच विधानसभा महायुतीकडे तर एक महाविकास आघाडीकडे आहे.
कल्याण पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटचे शिलेदार विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे सचिन बासरे यांचे आव्हान आहे. भाजपच्या दोन्ही बंडोखोरांनी आपली तलवार म्यान केली आहे. पण अंतर्गत धुसफुशीचा फटका येथे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भिवंडी ग्रामीणमध्येही हीच परिस्थिती आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे महादेव घाटाळ असा सामना आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवाराने माघार घेतली आहे. पण अंतर्गत कलहाचा आणि शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार असल्याने या मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. भिवंडी पश्चिम आणि पूर्वमध्ये बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. भिवंडी पश्चिममध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. काँग्रेसच्या दयानंद चोरगे हे भाजपचे विद्यमान आमदार महेश चौघुले यांना टक्कर देत आहेत. सपानेही येथे उमेदवार उभा केला आहे. भुमीपूत्र आणि मुस्लीम मतांवर या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे. भिवंडी पूर्वमध्ये महाविकास आघाडीने सपाचे विद्यमान आमदार रईस शेख यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. शेट्टी यांना विधानसभा निवडणुकीचा अनुभव आहे. मात्र मुस्लीम बहूल मतदारसंघ असल्याने महायुतीच्या रणनितीवर विजय अवलंबून आहे. शहापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पांडूरंग बरोरा असा सामना आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहता प्रत्येक निवडणुकीत विद्यमान आमदारांना पाच वर्षांसाठी मतदार घराचा रस्ता दाखवत असल्याचे दिसून आले आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोराने माघार घेतल्यामुळे सध्यातरी पांडूरंग बरोरा यांचे पारडे जड दिसते. मुरबाडमध्ये यंदा इतिहास घडेल का याकडे सर्वच राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे. सलग निवडणूक जिंकणारे भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार असा थेट सामना आहे. याठिकाणी मनसेनेही महिला उमेदवार दिला आहे. नुकतेच घडलेले बदलापूर प्रकरण, खुंटलेला विकास असे प्रभावी मुद्दे या ठिकाणी आहेत. याशिवाय माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार हे निवडणूक लढवत असल्याने येथील लढत चुरशीची ठरली आहे.

शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट
कोपरी- पाचपाखाडी, ओवळा- माजिवाडा, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, भिवंडी ग्रामीण

राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट
कळवा- मुंब्रा, शहापूर,

भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट
ठाणे, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पूर्व, ऐरोली

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट
बेलापूर, उल्हासनगर, मुरबाड

भाजप विरुद्ध काँग्रेस
मीरा- भाईंदर, भिवंडी पश्चिम