पावसामुळे कचरा प्रक्रिया यंत्रणा बंद
ठाणे : भंडार्लीतील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करताना सतराशे विघ्न आली होती, त्यात परतीच्या मुसळधार पावसाने प्रकल्पाची नासधूस केल्याने तो बंद करण्याची पाळी ठाणे महापालिकेवर आली आहे.
काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडार्लीच्या पूर्ण प्रकल्पातच पाणी शिरले आहे तर कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रांमध्ये गाद्या, प्लास्टिक तसेच फर्निचर अडकल्याने ही यंत्रेही बंद पडली आहेत. त्यामुळे दीड महिन्यापूर्वी जिथे ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होत होती, ती आता ७ सप्टेंबरपासून बंद झाली आहे. परिणामी हा कचरा पुन्हा दिव्यातच अनधिकृतपणे टाकला जात असल्याची कबुली प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
याशिवाय पावसामुळे येथील जोड रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहने जाणेही अशक्य झाले आहे. पर्यायाने हा प्रकल्प बंद करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.
मुंब्रा-दिव्यासाठी तात्पुरती पर्यायी जागा
मुंब्रा-दिव्यातील ३०० मेट्रीक टन कचऱ्यासाठी आता पालिकेने दोन पर्याय पुढे आणले आहेत. त्यामध्ये मुंब्य्रातील कचरा आता एमएम व्हॅली येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर तर दिव्यातील कचरा हा डवले येथील शासकीय भुखंडावर टाकला जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबरपर्यंत हे दोन्ही प्रकल्प तात्पुरत्या स्वरुपात सुरु होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. या ठिकाणी गोळा होणारा कचरा पुढे भंडार्लीला नेला जाणार असून २ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने येथील प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
या महिना अखेरपर्यंत दिवा डम्पिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करून भंडार्ली येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दिवा आणि मुंब्र्याच्या कचऱ्यासाठी नवीन जागा शोधण्यात आल्या असून ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्यात येणार असून हे काम देखील २८ सप्टेंबरपर्यंत सुरु होणार आहे, अशी माहिती उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.