दिव्यात छुप्या पद्धतीने डम्पिंग ग्राउंड सुरू

सत्ताधारी व पालिका प्रशासनाकडून दिवेकरांची फसवणूक!

ठाणे : दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद केल्याचे जाहीर झाल्यानंतर आजही छुप्या पद्धतीने दिव्यात डम्पिंग ग्राउंड सुरू असल्याने ही दिवावासीयांची पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी केलेली फसवणूक असल्याचा आरोप होत आहे.

दिवा डंपिंग ग्राउंड बंद करत असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र दिवा शहरातील डम्पिंग ग्राउंड हे मागील काही महिन्यांपासून छुप्या मार्गाने सुरू आहे. या ठिकाणी कचरा आणून टाकला जात आहे. ही दिवा वासियांची घोर फसवणूक आहे. पालिका प्रशासनाने शब्द देऊनही दिव्यातील जनतेला पुन्हा कचऱ्याच्या धुरात जीव गुदमरण्यासाठी सोडले आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

महापालिका प्रशासनाने एकदा हे डम्पिंग ग्राउंड बंद केल्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा तेच डम्पिंग सुरू करण्याचे कसे काय ठरवले? यामागे बोलवता धनी कोण आहे? दिव्याला डम्पिंग ग्राउंड समजणारी मानसिकता कोणती आहे? याची उत्तरे सर्वसामान्य दिवा वासीयांना मिळायला हवीत. दिव्यात डंपिंग ग्राउंडमुळे येथील महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हवा दूषित होते. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शहरात दुर्गंधी पसरते आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून दिव्यातील डम्पिंग कायमचे बंद करण्यात यावे व छुप्या मार्गाने दिवा डंपिंगवर टाकण्यात येणारा कचरा तत्काळ रोखावा अशी अशी मागणी ज्योती पाटील यांनी या पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

डंपिंगच्या नावाखाली कचरा टाकून खाडी बुजवली जात असून त्यावर अनधिकृत बांधकामे देखील उभी केली जात आहेत, त्यामुळे नाले गटारांची तोंडे बंद होत असून भरतीचे पाणी नागरी वस्तीत उलट दिशेने फिरत आहे. पावसाळ्यात याचा मोठा फटका नागरिकांना बसत असल्याचा संताप दिवेकर व्यक्त करत आहेत.