१४२ नगरसेवकांची संख्या पुन्हा १३१ वर
ठाणे : नव्या प्रभाग रचनेनुसार नगरसेवक वाढल्याने बाहेरून आलेले आणि सगे-सोयरे यांची व्यवस्था उमेदवारी देताना होणार होती, पण आता जुनीच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आल्याने या इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत.
महापालिकांची निवडणूक जुन्याच प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे आता ठाणे महापालिकेची निवडणूकही चार सदस्यीय पॅनल पद्धतीने होणार असल्याने याचा सर्वाधिक फटका इच्छुकांना बसणार आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यांचा पॅनल केल्याने नगरसेवकांची संख्या ११ ने वाढून १४२ झाली होती. तर प्रभागांच्या संख्येतही वाढ होऊन ४२ प्रभाग तयार झाले होते. त्यामुळे इच्छुकांच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. यात बाहेरून आलेले आणि नगरसेवकांचे नातेवाईक यांची व्यवस्था होणार होती. मात्र जुनीच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आल्याने इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार तीन सदस्यांचा एक प्रभाग तयार करण्यात आला होता. ३५ ते ३६ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग करण्यात आल्यामुळे प्रभागांच्या संख्येत वाढ झाली होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत पालिकेचे ३३ प्रभाग होते. त्यापैकी एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. त्यानुसार पालिकेतील नगरसेवकांची संख्या १३१ इतकी होती. परंतु नव्या रचनेत नगरसेवकांच्या संख्येत ११ ने वाढ होऊन प्रभागांची संख्या ४७ इतकी झाली होती. यामुळे वाढलेल्या प्रभागातून अनेकांनी निवडणुक लढविण्याची तयारी सुरु करत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली होती. काल राज्य शासनाने नवीन प्रभाग रचना रद्द करत जुन्याच म्हणजेच २०१७ सालाप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नव्या रचनेत वाढलेली ११ नगरसेवकांची संख्या कमी होऊन पालिकेत पुर्वीप्रमाणेच १३१ इतकेच नगरसेवक असणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यामुळे या प्रभागांमध्ये निवडणुक लढविण्याची तयारी करणाऱ्या इच्छूकांचा पदरी निराशा पडली आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूक २०११ सालच्या जणगणनेनुसार होणार आहे. यानुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१,४८८ इतकी आहे. या लोकसंख्येनुसार नव्या रचनेत तीन सदस्यांचे एकूण ४७ प्रभाग तयार करण्यात आले होते. त्यापैकी ४६ प्रभाग तीन सदस्यांचा तर एक प्रभाग चार सदस्यांचा होता. या प्रभागांमधून एकूण १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. परंतु राज्य शासनाने ही रचना रद्द करून जुनीच म्हणजेच २०१७ ची प्रभाग रचना कायम ठेवली आहे. शासन निर्णयानुसार १२ लाखांपर्यंत नगरसेवक संख्या ११५ इतकी असेल असे सांगण्यात आले आहे. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार इतक्या अधिक लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतुद करण्यात आली आहे. यानुसार १२ लाख लोकसंख्या वगळून उर्वरीत ६ लाख ४१,४८८ लोकसंख्येतून १६ अतिरिक्त नगरसेवक निवडून येणार आहेत. ११५ आणि अतिरिक्त १६ अशी एकूण १३१ इतकी नगरसेवक संख्या होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.