ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा अपघात टळला

ठाणे : ठाकुर्ली-कल्याण दरम्यान ट्रॅकमनला रेल्वे फ्रॅक्चर दिसल्याने त्याने धावत जाऊन वेगाने येणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसला लाल सिग्नल दिला. सिग्नल मिळताच एक्सप्रेस वेळीच थांबल्याने मोठा अपघात टळला.

मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास ट्रॅकमन हिरा लाल (२६) आणि मिथुन कुमार (२३) हे कर्तव्यावर असताना त्यांना पत्रीपुल, कल्याणजवळ रेल्वे फ्रॅक्चर दिसले. त्या मार्गावरून इंद्रायणी एक्सप्रेस (२२१०५) वेगाने येत असल्याचे पाहून मिथुन कुमार यांनी पुढे धावत जाऊन ताबडतोब लाल सिग्नल दाखवला. सिग्नल दिसताच मोटरमनने वेळीच ट्रेन थांबवली. सकाळी ७:१५ च्या सुमारास मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आले.

हिरा लाल आणि मिथुन कुमार यांच्या सतर्कतेमुळ मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या या कर्तव्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात आले.