मुसळधार पावसाने उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागली

बदलापूर : गेल्या काही दिवस तसेच गुरुवार रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बदलापूर पश्चिम भागातून वाहणारी उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागली आहे. उल्हासनदीने शुक्रवारी  संध्याकाळी ४ वा.पर्यंत १६ मी.ची पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून बदलापूर व लगतच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात गुरुवारी  रात्रीपासून पावसाने अधिकच जोर पकडला आहे. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. तर रस्त्यावरील खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे वाहने चालवताना नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या जोरदार पावसामुळे बदलापूर पश्चिम भागातून वाहणाऱ्या उल्हासनदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. बदलापुरात उल्हासनदीच्या पाण्याची पातळी १६ मी. पर्यंत पोहचली आहे.

उल्हासनदीची इशारा पातळी १६.५० मी. इतकी असून धोक्याची पातळी १७.५० मी. आहे. बदलापूर परिसरात पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यासही उल्हासनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास बदलापुरात उल्हासनदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढून नदीकाठाजवळच्या सखल भागात पाणी शिरून ते जलमय होण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने अग्निशमन दलमार्फत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

उल्हासनदीच्या पाण्याची पातळी दुपारी ४ वा. सुमारास १६ मीटर पर्यंत पोहचली आहे.या पार्श्वभूमीवर उल्हास नदी पात्राजवळ दोरखंड बांधून नागरिकांना तिकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नदी पात्राजवळ अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरातील पश्चिमेकडील सखल भागात असलेल्या एअरसन स्कुलमधील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे. सहवास वृद्धाश्रम तसेच रितू वर्ल्ड, वॉटर एज आदी नदीकाठी असलेल्या बंगल्याच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना व नदीजवळ असलेल्या तबेल्यातील सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय रमेशवाडी, हेंद्रेपाडा आदी सखल भागात उद्घोषणा करून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी दिली.