कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण रेल्वे स्थानकाला केला जाणारा पाणी पुरवठा १२ तासांहून अधिक काळासाठी खंडित केला. कल्याण रेल्वे स्थानकाकडून पाणीपट्टीचे तब्बल चार कोटी ४१ लाख थकवल्याबद्दल महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. रेल्वेने यातले एक कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला.
कल्याण रेल्वे स्थानकासह, रेल्वेच्या विविध आस्थापनांना मिळून कल्याण-डोंबिवली महापालिकेने ११ अधिकृत नळ जोडण्या पुरवल्या आहेत. यात आंबिवली, टिटवाळा येथील रेल्वे आस्थापनांचाही समावेश आहे. या सर्व ११ अधिकृत नळ जोडण्यांचे पाणी देयक गेल्या अनेक महिन्यांपासून थकले आहे. ही थकबाकी आठ कोटींहून अधिक असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे कल्याण रेल्वे स्थानकातले पाणी बराच काळासाठी थांबले असल्याने रेल्वे स्थानकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
याबद्दल कडोंमपाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फक्त कल्याण रेल्वे स्थानक परिसरातीलच रेल्वेच्या आस्थापनांचे चार कोटी ४१ लाख थकवल्याबद्दल ही कारवाई आहे. यात शनिवारी कल्याण रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणारे पाण्याचे दोन वॉल्व्ह बंद करण्यात आले. मात्र, त्यानंतर मध्ये रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी सरकारकडे पाठपुरावा करून एक कोटी भरण्याची तयारी दर्शविली. तसेच, उर्वरित सर्व रक्कम कशी भरायची याबद्दल महापालिका आणि रेल्वे यांच्यात एक बैठक पार पडेल. त्यानंतर त्याबद्दलचा निर्णय होईल. त्यामुळे आज रेल्वेचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे.