कोरोना परिस्थितीमुळे मनोरुग्णांची संख्या कमी

* रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
* ८२ रूग्णांचे पुनर्वसन

ठाणे : रेल्वे जागा हस्तांतरणामुळे ठाणे मनोरूग्णालयातील ८२ रूग्णांचे पुण्यातील तळोजा येथील सामाजिक संस्थेमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. कोरोना परिस्थितीमुळे केवळ अत्यावश्यक रुग्णांची भरती व मनोरुग्णांनी टाळलेले उपचार या गोष्टींमुळे ठाणे मनोरुग्णालयातील मनोरुग्णांची संख्या रोडावल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात भरती होणा-या मनोरुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्याच्या घडीला रूग्णालयात ९४७ रूग्ण उपचार घेत आहेत.

ठाणे मनोरुग्णालयाचा परिसर मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. यापैकी काही जागा केंद्र सरकारच्या रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. हस्तांतरित करण्यात येणा-या जागेमध्ये मनोरुग्णालयाचे ८,९ आणि १० हे महिला विभागाचे वॉर्ड आहेत. परिणामी येथील महिला मनोरुग्णांना सामाजिक संस्थांच्या मदतीने पुण्यात स्थलांतरित करण्यात आले. तर ह्या जागेतील तीन वॉर्ड महापालिका रूग्णालयाच्या परिसरातच दुसरीकडे बांधून देणार आहे. त्याचे कामही सुरू झाले असून इतर महिलांना बांधकाम झाल्यानंतर तेथे हलविण्यात येणार आहे. तर गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना संकटाचा परिणाम देखील ठाणे मनोरुग्णालयावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन घोषित झाल्याने तब्बल वर्षभर बाह्यरुग्णांनी ठाणे मनोरुग्णालयात येऊन उपचार घेण्यास टाळाटाळ केली. ठाणे मनोरुग्णालयात राज्यभरातून रुग्ण दाखल होत असतात. मात्र या काळात वाहतूक व्यवस्थेचा अभाव निर्माण झाल्याने अनेक रुग्णांनी ठाणे मनोरुग्णालयात येण्यास ईच्छा दर्शवली नाही.

ठाणे मनोरुग्णालयाऐवजी इतर जिल्ह्यातील रुग्णालये तसेच सामाजिक संस्थांना प्राधान्य दिले. तसेच कोरोना काळात प्रादुर्भाव वाढून संक्रमण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मनोरुग्णालय प्रशासनाकडून केवळ अत्यावश्यक रुग्णांनाच रुग्णालयात भरती करून घेण्यात येत होते. याचा देखील परिणाम रुग्णालयातील मनोरुग्ण संख्येवर झाल्याचे स्पष्ट होते.

तीन वॉर्ड पालिका बांधून देणार

सध्या उपचार घेऊन बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्या रूग्णालयात ९४७ रूग्ण उपचार घेत आहेत. महिला वॉर्डमधील ज्या महिला आहेत, त्यांना महापालिकेने तीन वॉर्ड बांधून दिल्यानंतर तिथे हलविण्यात येईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.