आरटीओने घेतली ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम

१०० बस चालकांची केली तपासणी

ठाणे : कुर्ला बेस्ट अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग’ अलर्ट मोडवर आला आहे. ठाणे महानगरातूनही २४ तास धावणा-या विविध प्रक्रारच्या वाहनांची अशा अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल ‘आरटीओ’ने घेतली आहे.

शहरातील तीन हात नाका, नितीन जंक्शन, घोडबंदर रोड अशा विविध ठिकाणी ठाणे परिवहन, नवी मुंबई परिवहन, मीरा-भाईंदर परिवहन आदींच्या बसेस, स्थानकांवर १६ ते १८ डिसेंबर या दिवसांत रात्रीच्या वेळी बसचालकांची ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ तपासणी केली. यावेळी कोणताही चालक मद्यप्राशन करून बस चालवताना आढळून आला नाही. मात्र ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे ठाणे परिवहन विभागाचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात कुर्ल्यातील बस दूर्घटनेत काही व्यक्तींचा दुदैवी मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले होते. या अपघाताची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. त्यामुळेच ठाणे शहरातून बेफाम वेगाने धावणा-या सर्व बस प्राधिकरण चालकांची ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’तपासणी करण्यात आली आहे आणि गेले तीन दिवस रात्रीच्यावेळी बस थांब्यावर थांबवून सुमारे १०० बस चालकांची ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ तपासणी करण्यात आली.
वाहतूक नियम डावलून वाहन चालवल्यावर रस्ते अपघात होण्याची दाट शक्यता असली, तरीही असंख्य दुचाकीस्वार, चार चाकी आणि खाजगी ब-याच बसगाड्यांचे चालक बेफामपणे वाहन चालवताना दिसतात.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने देखील या पुढे असा अपघात घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील बस थांब्यावर उभे राहून विभागाच्या वायुवेग पथकाने विविध बस प्राधिकरणाच्या १०० चालकांची ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी केली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.