घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूल झाले जीवघेणे
ठाणे : घोडबंदर मार्गावरील सर्वच उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
ठाण्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील नव्यासह जुन्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या हालचाली सुरु आहेत. परंतु पावसाची उघडीप मिळत नसल्याने खड्डे बुजविण्याचे कार्यात अडथळे येत आहेत. असे असले तरी ठाणेकरांचे मात्र या खड्ड्यांमुळे चांगलेच हाल होतांना दिसत आहेत. आजही शहरातील तीन हात नाका, नितिन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापुरबावडी, वाघबीळ या एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलांवर खड्डे खड्डे असे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावल्याचे चित्र दिसू लागले आहे.
हे खड्डे त्या-त्या प्राधिकरणांकडून बुजविले जात आहेत. त्यासाठी या खड्ड्यांमध्ये खडीमिश्रित डांबराचा मुलामा दिला जात आहे. परंतु सातत्याने पडत असलेल्या या पावसाने ही खडी वाहून अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरली आहे. परिणामी त्यावरून घसरून दुचाकीस्वाराचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर पडलेली खडी बाजूला करण्याचे औदार्यही संबंधित यंत्रणांकडून दाखवण्यात येत नाही. भविष्यात जर याठिकाणी अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पावसाची उघडीप नसल्याने या खड्ड्यांमध्ये अधिक भर पडल्याचे दिसत आहे. याशिवाय घोडबंदर भागातील मुख्य रस्त्यांना देखील खड्डे पडले असून त्यामुळे देखील वाहनांचा वेग मंदावल्याचे दिसत आहे.