भूमाफिया आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने कळवा, मुंब्रा, दिवा, कोलशेत, बाळकुम खाडी धोक्यात
भरावाने खाडीचे पात्र अरुंद, भरतीचे पाणी नागरी क्षेत्रात
सुरेश सोंडकर/ठाणे
कळवा-विटावा खाडीत मातीचा भराव आणि अनधिकृत बांधकामांनी खारफुटी उद्ध्वस्त होऊन खाडीचे पात्रही अरुंद झाले आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदाच भरतीचे पाणी सिडको सब वे मध्ये शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. निसर्गाने भविष्यातील संकटाचा दिलेला हा इशारा असून हीच परिस्थिती मुंब्रा, दिवा, कोलशेत, बाळकुम खाडी परिसरात उद्भवणार असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
ठाणे पूर्वेपासून गायमुखपर्यंत खाडीलगत भराव टाकून अनधिकृत बांधकामे आणि झोपड्या उभ्या राहिल्याने २८ एप्रिल २०२५ रोजी प्रथमच ऐन उन्हाळ्यात सिडको येथील सबवे मध्ये खाडीतील भरतीचे पाणी शिरून वाहतूक विस्कळीत झाली. निसर्गाने ठाणे शहराला दिलेला हा इशारा असल्याचे बोलले जात आहे.
विटावा-कळवा खाडीच्या दुतर्फा गेल्या काही वर्षात मातीचा भराव मोठ्या प्रमाणात टाकून शेकडो बांधकामे उभी राहिली त्यामुळे सध्या येथील खाडी पात्र अर्धे अधिक अरुंद झाले आहे.
चुहा ब्रीज, मुंब्रा येथे देखील मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात येत असून त्यावर बांधकाम करण्याचे नियोजन असल्याचे दिसून येत आहे. येथेच बंदी असताना ठाणे महापालिकेने कचरा टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा खाडी परिसर उद्ध्वस्त होण्यात महापालिकेचा देखील वाटा आहे. या प्रकरणी भूमाफियांसह संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दिवा पश्चिमेच्या खाडी किनारी उग्रेश्वर मंदिराजवळ गणेश घाट येथे वर्षभरापासून अनधिकृतपणे मातीचा भराव टाकण्यात येत असून संबंधित भूखंडाला संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. भविष्यात येथे भूमाफियांनी चाळी आणि इमारती बांधण्याचा घाट घातला आहे. तर एमटीएनएल ऑफिसजवळ मातोश्री नगर भागात खाडी पात्रात भरणी करून इमारती उभारण्यात आल्या आहेत. अशाच पद्धतीने संपूर्ण दिवा खाडीतील खारफुटीवर मातीचा भराव टाकून ती नष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे येथील खाडी पात्र अरुंद झाले असून याचा फटका पावसाळ्यात हजारो दिवेकरांना बसत असतो.
कोलशेत जलवाहिनीलगत खाडीत मातीचा भराव टाकून खारफुटी उद्ध्वस्त करण्यात आली असून त्यावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. बाळकुम येथे दादलानी पार्क रस्ता, अशोकनगरमागे असलेल्या खाडीत देखील मातीचा भराव टाकण्यात येऊन खाडी अरुंद केली आहे. यावर अनधिकृत बांधकामे करण्याचा भूमाफियांचा डाव असल्याचे दिसत आहे.
कळवा, विटावा, मुंब्रा, दिवा, बाळकुम, कोलशेत येथील खाडी येत्या काही दिवसात नष्ट होऊन संपूर्ण ठाणे आणि दिवा शहरावर पुराचे संकट चालून येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
२८ एप्रिल २०२५ रोजी सिडको सबवे येथे शिरलेले भरतीचे पाणी हा महापालिकेने निसर्गाचा इशारा समजावा आणि खाडीलगत माती भराव करणाऱ्या आणि बांधकामे करणाऱ्या भूमाफियांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच यापुढे खाडीलगत माती भराव आणि त्यावर अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात यावा, खाडी किनाऱ्यालगत सी सी टीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात यावे, याबाबत अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी दक्ष आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.