नालेसफाईची कामे १५ एप्रिलपासून

आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

ठाणे : नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले.

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले.

या बैठकीत, नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, १५ एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

वंदना एसटी स्टॅण्डसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली.

मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आप्तकालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

बैठकीनंतर, ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसेच, मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आप्तकालीन कक्षात असावेत, असे आयुक्त श्री. राव म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिली. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तिव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिरालाही आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले.

या भेटीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी उपस्थित होते.