कल्याण: यंदाचा याज्ञवल्क्य पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ.नरेश चंद्र आणि ठाणेवैभव वृत्तपत्राचे ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ यांना जाहीर झाला आहे.
शिक्षणसेविका विद्या धारप यांना सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याज्ञवल्क्य संस्थेतर्फे नुकतीच यंदाच्या पुरस्कार देण्यात येणाऱ्या मान्यवर व्यक्तींची नावे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला याज्ञवल्क्यचे विश्वस्त मिलिंद कुलकर्णी, राजीव जोशी, राधाकृष्ण पाठक, कार्यवाह प्रसन्न कापसे उपस्थित होते.
येत्या शनिवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कल्याणातील आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिर येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आमटे, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीकांत बोजेवार आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही संस्थेतर्फे देण्यात आली.
कल्याणला भारतचार्य वैद्य, कवी माधवानुज, भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, कथाकार दि.बा.मोकाशी, अंबादास अग्निहोत्री, साहित्यिक वि.आ.बुवा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भाऊ साठे, उत्कृष्ट संसदपटू आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल प्रा.राम कापसे, कृष्णराव धुळप अशा महान विभूतींची दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. आधुनिक काळातही कल्याणच्या वैभवात भर टाकणाऱ्या कर्तृत्ववान मंडळींच्या कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने १९९९ सालापासून याज्ञवल्क्य संस्थेकडून याज्ञवल्क्य पुरस्काराची संकल्पना राबविण्यात येत आहे.
सुशिलाबाई एकलहरे या कल्याणातील धडाडीच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या स्मरणार्थ सन २००७ पासून संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुरेश एकलहरे यांनी विविध क्षेत्रात निरलस कार्य करणाऱ्या महिलांना सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार सुरू केला आहे. आजतागायत १२ व्यक्तींना याज्ञवल्क्य पुरस्कार तसेच सात महिलांना सुशिलाबाई एकलहरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.