आरोग्यमंत्र्यांकडून निलंबन रद्द
उल्हासनगर : उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाची १०८ रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला म्हणुन त्यांना जबाबदार धरुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांचे ५ मार्च रोजी निलंबन करण्यात आले होते. मात्र शासनाने त्यांचे निलंबन रद्द केले असून पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर ते रुजु होणार आहेत.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात २५ जानेवारी रोजी एका रुग्णाला उपचारासाठी मुंबई येथे नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिकेला फोन करुन देखिल ती रुग्णवाहिका वेळेवर पोहचली नसल्यामुळे त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी नेता आले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेबाबत तक्रार असताना मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांना जबाबदार धरत त्यांना ५ मार्च रोजी निलंबित करण्यात आले होते. डॉ.बनसोडे यांचे निलंबन हे चुकीच्या पध्दतीने झाले म्हणुन शहरातील जागरूक नागरिक व संघटना यांनी शासनाला धारेवर धरत बनसोडे यांचे निलंबन रद्द करा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात आमदार कुमार आयलानी यांनी सुध्दा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन डॉ. बनसोडे यांचे निलंबन रद्द करुन पुन्हा त्यांना मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक पद बहाल करा, अशी मागणी प्रत्यक्षात भेट घेऊन केली होती. तेव्हा आरोग्य मंत्र्यानी आमदार कुमार आयलानी यांच्या मागणीची दखल घेत त्यांचे निलंबन रद्द करुन डॉ. मनोहर बनसोडे यांना पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर त्यांची पुनर्नियुक्ती केली आहे.