ठाणे: शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम सातारा व ठाणे जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर होऊ नये यादृष्टीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची बैठक घेऊन कठोर कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच दोन्ही जिल्ह्यांतील आरोग्य प्रशासन झाडून कामाला लागल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात सुरू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी, १८ मार्च रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे दोन्ही जिल्ह्यांतील आरोग्यसेवा आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आरोग्य विभागावर परिणाम होऊ देऊ नये. संपकाळात एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली होती. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन कठोर कार्यवाही करावी, असे निर्देश देसाई यांनी याप्रसंगी दिले होते.
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार रविवारी सकाळपासूनच संबंधित अधिकाऱ्यांनी सक्रीय होत जिल्ह्यात फिरते दौरे सुरू केले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयांतील बाह्य रुग्णांच्या तपासणीवर परिणाम होणार नाही व नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य
चिकित्सक यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई यांनी ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा संपकाळातही सुरळीत राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि त्यांची तातडीने अंमलबजावणीही सुरू झाली. यामुळे ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ याची प्रचिती आल्याची भावना नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संप कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवण्यात यावी. तसेच ‘एनआरएचए’चे कर्मचारी संपात सहभागी असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्या जागी बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, असेही निर्देश देसाई यांनी दिले आहेत. जे कर्मचारी संपात सहभागी नाहीत व कार्यालयात वा रुग्णालयात उपस्थित असतात, परंतु कर्मचारी संघटनांतील कर्मचारी त्यांना कामावर येण्यास अडथळा निर्माण करत असतील, तर अशा अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध संबंधित विभागप्रमुखांनी तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देसाई यांनी बैठकीत दिले आहेत.
रविवारी सकाळपासूनच जिल्हा आरोग्य प्रशासनाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली असून प्रशासन संपकाळातही आरोग्य सेवा सुरळीत राखण्याच्या दृष्टीने सक्रीय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.