ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी उद्या 13 ऑगस्टपासून सुरू होणारे ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी केल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी दिली.
जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून ‘स्वराज्य महोत्सवास’ प्रारंभ झाला असून त्यामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायती यासोबतच विविध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी, पोलीस आणि क्रिडा विभागाच्या वतीने आयोजित मॅरेथॉन, रॅली, शहर आणि जिल्ह्यातील कार्यालये आणि ऐतिहासिक वास्तूंना केलेली रोषणाई, वृक्षारोपण आदी विविध उपक्रमांमुळे वातावरण भारावून गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वराज्य महोत्सवानिमित्त अनेक विभागांनी कल्पक उपक्रम राबवून अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील भातसा आणि तानसा या धरणातील विसर्गावर तिरंगा रोषणाईची अभिनव संकल्पना साकारणारा ठाणे जिल्हा पहिला असेल. असे त्यांनी सांगितले. याकामी पुढाकार घेणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो. जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव उपक्रमात कार्यक्रमांची रेलचेल असून नागरिक उत्साहाने त्यात सहभागी होत आहेत.
जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले की, ‘स्वराज्य महोत्सव’अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत 21 विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे देशभक्तीपर गीतांचा जागर हा कार्यक्रम असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम होणार आहे.