आठवलेंनी पँथरची काळजी करू नये – मल्लिका ढसाळ

ठाणे : नामदेव ढसाळ जीव धोक्यात घालून दलितांवर अन्याय करणाऱ्यांचा मुकाबला करीत होते, तर पँथरची काळजी आहे असे दाखवणारे आजचे नेते तेव्हा घरात बसून कपडे सांभाळण्याचे काम करीत होते आणि आता आताच अशा नेत्यांना दलित पँथरची काळजी वाटत आहे, पण ही काळजी नसून त्यांची येणाऱ्या निवडणुकीची सोय आहे, असे रोखठोक प्रतिपादन दलित पँथरच्या श्रेष्ठी तथा नामदेव ढसाळ यांच्या पत्नी, लेखिका मल्लिका ढसाळ यांनी केले.

नामदेव ढसाळ यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी त्या ठाण्यात उपस्थित झाल्या होत्या. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी भदंत महाविरो, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे, केंद्रीय कमिटीचे जनार्दन घायमुक्ते, स्वामी पिल्ले, शंकर बुकाणे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रोहित पिसाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनीही गटतट निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पुढाऱ्यांचा समाचार घेतला. ज्यांनी नामदेव ढसाळांशी गद्दारी केली, त्यांना यातना दिल्या, एकटे पाडण्याचा प्रयत्न केला, तेच गद्दार आज दलित पँथर पुनर्जीवित करू असे म्हणताहेत. जर अशांना पँथर वाढवायची होती, तिची काळजी घ्यायची होती तर यांनी आपापली वेगळी चूल मांडून समाजाला प्रस्तापित पक्षांच्या दावणीला का बांधले? असा सवाल उपस्थित करीत पँथर अशा गद्दारांना कधीच माफ करणार नाहीत, असा हल्लाही चढविला.

दलित पँथरच्या वतीने नामदेव ढसाळ यांची १५ फेब्रुवारी रोजी ठाण्यात जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संघटनेची भूमिका विषद करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. नामदेव ढसाळ आणि मल्लिका ढसाळ यांचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे, मुंबई, पनवेल, रायगड, पुणे येथील पँथरचे पदाधिकारी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मान्यवरांच्या हाते नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेला फुले वाहून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. आगामी ९ जुलै रोजी दलित पँथर संघटनेचा ५० वा वर्धापनदिन आहे. हा वर्धापनदिन दलित पँथर देशभरात साजरा करणार आहे. मुंबईतही हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाईल. असे सांगतानाच ढसाळ यांच्या दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची घोषणा काही गटातटाच्या नेत्यांनी केली आहे. त्यांना नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरचे सांगणे आहे की, तुम्ही दलित पँथरच्या कार्याचा नक्कीच गवगवा करा, पण तुमच्या नियतीत खोट असल्याने तुम्ही पँथर म्हणवून घेण्यास पात्र नाहीत, आज ढसाळ दादा आरोग्य विषयीक अडचणीत असताना त्यांना व पँथरला तुम्हा नेत्यांची गरज होती, ज्या पँथरने तुम्हाला घडवले ती अडचणीत असताना तिला ताकद देणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. पँथरचे नाव घेऊन मोठे झालात पण पँथरला मात्र मोठे करण्याची नियत ठेवली नाहीत. हे समाजाने पाहिले आहे. परिणामी तो अशा नेत्यांपासून दूर झाला आहे. दूर झालेल्या या समाजाला जवळ करण्यासाठी आता सगळ्यांना पँथर हवी आहे. पण आता असे होणार नाही. दादांची पँथर त्यांच्याच स्टाईलने आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत असेही मल्लिका ढसाळ आणि रामभाऊ तायडे यांनी सांगितले.