डोन्ट क्विंट एकांकिकेने पटकावला कोकण चषक

‘गोदा’ आणि फ्लाइंग राणी’ला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक

ठाणे : कोकण कला अकादमी आणि संस्कार प्रतिष्ठान आयोजित कोकण चषक २०२२ एकांकिका स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत स्वप्नपूर्ती क्रियेशन या संस्थेच्या डोन्ट क्विंट या एकांकिकेने कोकण चषक पटकावला.

आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण कला अकादमी आणि संस्कार प्रतिष्ठान आयोजित कोकण चषक २०२२ हि एकांकिका स्पर्धा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात झाली. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रविवार ११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ पासून रात्री ११ वाजेपर्यंत या एकांकिका सादर झाल्या. स्पर्धेचे उदघाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले.

प्राथमिक फेरीमध्ये तब्बल १८ संस्थांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या एकांकिकांची प्राथमिक फेरी ९ आणि १० डिसेंबर रोजी आनंद विश्व गुरुकुल शाळा येथे सादर झाल्या. प्राथमिक फेरीचे परीक्षण भालचंद्र कुबल आणि मृणाल चेंबूरकर यांनी केले.

अंतिम फेरीमध्ये कलामंथन संस्थची फ्लाईंग राणी, ज्ञानसाधना नाट्य परिवार संस्थेची डोक्यात गेलंय, कलासक्त मुंबई संस्थेची राकस, वझे महाविद्यालय संस्थेची जन्नत उल फिर्दोस, स्वप्नपूर्ती क्रिएशन्स या संस्थेची डोन्ट क्विंट, माय नाटक कंपनी (विरार) या संस्थेची गोदा, कलरफुल माँक या संस्थेची टिनीटस या संस्थांनी प्रवेश मिळवला होता.

स्वप्नपूर्ती क्रियेशन ह्या संस्थेच्या डोन्ट क्विंट या एकांकिकेने कोकण चषक पटकावला. या एकांकिकेचे लेखन अनिकेत बोले यांचे असून दिग्दर्शन अनिकेत-प्रफुल्ल यांनी केले आहे. माय नाटक कंपनी ह्या संस्थेच्या गोदा या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. या एकांकिकेचे लेखन अनिकेत मोरे यांनी केले असून दिग्दर्शन शार्दूल आपटे यांनी केले आहे. कलामंथन या संस्थेच्या फ्लाईंग राणी ह्या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. या एकांकिकेचे लेखन मोहन बनसोडे यांनी तर दिग्दर्शन विजय पाटील यांनी केले. या विजेत्यांचे आणि अंतिम फेरीतील सर्व सहभागी संस्थांचे कौतुक श्री.केळकर यांनी केले.

कोकण चषक २०२२ च्या अंतिम फेरी चे परीक्षक मृणाल चेंबूरकर, भालचंद्र कुबल, शिरीष लाटकर, संगीत कुलकर्णी, किशोरी आंबिये यांनी केले. पारितोषिक वितरण प्रा.प्रदीप ढवळ, राजेश उके, प्रा.मंदार टिल्लू आणि वरील सर्व परीक्षकांच्या हस्ते झाले तर ह्या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन  प्रा.मंदार टिल्लू, बाळकृष्ण ओडेकर, आकाश राऊत (देवराज साळवी), प्रा.हर्षाला लिखिते, सतीश आगाशे, प्रा.संतोष गावडे, वैभव पटवर्धन, अमोल आपटे, सुनील जोशी, राहुल कदम या समितीने केले.