ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारलेल्या वास्तूतही ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, तर ठाण्यातील क्लस्टर योजना दिशाहीन होत असून, कोणत्याही परिस्थितीत जनतेवर क्लस्टर लादू नये, असा इशाराही आमदार निरंजन डावखरे यांनी दिला.
विधान परिषदेच्या अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर आमदार डावखरे बोलत होते. ठाणे शहरातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची कामे दोन वर्षांपासून ठप्प झाली असल्याचे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे ठाणे येथे कार्यालय सुरू झाल्यानंतर, आतापर्यंत १५० पैकी ६९ प्रस्ताव मार्गी लागले. गेल्या दोन वर्षांत एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. कोपरी येथील झोपडपट्टी पुनर्विकास रखडला असून, ३५० कुटुंबांना बिल्डरने घरभाडेही न देता वाऱ्यावर सोडले आहे, याकडे श्री. डावखरे यांनी विधान परिषदेचे लक्ष वेधले. तर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसंदर्भात अॅपद्वारे आर्किटेक्टचे प्रस्ताव स्विकारले जात नसल्याने बिल्डरांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणाची तळी भरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा सवाल श्री. डावखरे यांनी केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात यूडीपी योजनेनुसार ठाण्यातील जुन्या अधिकृत इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाविकास आघाडी सरकारने जुन्या इमारतींचा विकास अडविण्याचे पाप केले आहे, अशी टीका आमदार डावखरे यांनी केली.
ठाणे शहरातील क्लस्टर दिशाहीन झाले असून, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांकडून क्लस्टर जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप श्री. डावखरे यांनी केला. क्लस्टरमधून ३२०, ३५० कि ४१० चौरस फुटांचे घर मिळणार, याबाबत स्पष्टता नाही. आधी खासगी बिल्डरकडून पुनर्विकास होणार असल्याचे सांगण्यात आले. आता त्यात सिडकोचा समावेश करण्यात आला आहे. क्लस्टरबाबत नागरिकांच्या हरकतींचा विचारही केला जात नाही. क्लस्टरबाबतच्या नियम व अटींचा मसूदा इंग्रजीत प्रसिद्ध केला जात आहे. उच्चस्तरीय समितीत लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचा समावेश करण्यात आलेला नाही, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.