मौजमजा टाळून ठाणेकरांनी सुट्टीचे तीन दिवस दिले प्रभू श्रीरामाला
ठाणे : एरव्ही हक्काच्या सुट्टीचे दिवस हॉटेल, पर्यटनासाठी खर्च करणाऱ्या तमाम ठाणेकरांनी यावेळी शनिवार, रविवार आणि सोमवार प्रभू श्रीरामाच्या कार्यासाठी अर्पण केले. विशेष म्हणजे शहरातील एका उच्चभ्रुंच्या गृहसंकुलातील रहिवाशांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी २५ लाखांची देणगी गोळा केल्याची माहिती मिळत आहे.
सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विधीपूर्वक झाला. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार गेले तीन दिवस देशभर विविध धार्मिक कार्यक्रम, रथयात्रा, रांगोळी प्रदर्शन, रॅली, भजन, कीर्तन आणि भक्तिगितांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सांस्कृतिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळख असलेले ठाणे शहरही गेले तीन दिवस रामनामात दंग झालेले पाहायला मिळाले.
एरव्ही शनिवार आणि रविवार हे दोन सलग सुट्टीचे दिवस म्हणजे सहल, हॉटेल, नाटक चित्रपट पाहणे किंवा घरी आरामात कुटुंबासह सुट्टीची मजा घेणे असा कार्यक्रम सर्वसाधारणपणे सर्वत्र पहायला मिळतो. मात्र अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवारीही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने सलग तीन दिवस सुट्टीची पर्वणी लाभली होती. ठाणेकर मात्र हे तिन्ही दिवस आयोजित धार्मिक कार्यक्रमात वावरताना दिसले, सहभाग घेताना दिसले.
शहरातील सर्व मंदिरे, रस्ते आणि धार्मिक स्थळे राजकीय पक्षांकडून स्वच्छ करण्यात आली होती. विविध ठिकाणी महाआरती, रोषणाई आदी माध्यमातून वातावरण निर्मितीही केली होती. मात्र त्याचवेळी शनिवार ते सोमवार असे तीन दिवस अनेक गृहसंकुलांमध्ये रहिवाशांनी पुढाकार घेऊन महाआरती, धार्मिक कार्यक्रम, रांगोळ्या, भजन-कीर्तन आणि भक्तिगितांचे कार्यक्रम आयोजित केले होते. इमारती, चाळी, झोपड्या यांसह दुचाकीपासून आलिशान गाड्यांवरही जय श्रीराम असा उल्लेख असलेले भगवे झेंडे फडकताना दिसत होते. काहींनी भगवे मफलर घालून वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक कुटुंबांनी घरी देव्हाऱ्यात नेहमीपेक्षा विशेष पद्धतीने विधिवत पूजा केली, जवळच्या मंदिरांमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले.
गेले तीन दिवस ठाणेकर विविध कार्यक्रमांत सहभाग घेताना दिसून येत आहेत. मासुंदा, उपवन अशा तलावांवर केलेली आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी सायंकाळी ठाणेकरांचे पाय तलावांच्या दिशेने सहकुटुंब वळलेले दिसत होते. शहरात आणखी कोणते कार्यक्रम सुरू आहेत ते पाहण्यासाठीही काहींनी शहरात फेरफटका मारला.
या तीन दिवसांत ठाणे शहरातून राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्यांची संख्याही वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील एका उच्चभ्रू लोकांच्या गृहसंकुलातील तीन इमारतींमधून तब्बल २५ लाखांची देणगी गोळा झाली होती. एकूणच श्री राम मंदिर सोहळा हा धार्मिकदृष्ट्या ठाणेकरांनी साजरा केलाच, शिवाय राष्ट्रीय अस्मिता म्हणूनही ठाणेकरांनी सुट्टीचे तीन दिवस मौजमजेत न घालवता राष्ट्रीय सोहळ्यात योगदान दिल्याचे पाहायला मिळाले.